

आळंदी : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदी देवस्थानकडून जय्यत तयारी सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून आळंदी आणि परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरातून पुण्याकडे जाणारे तिन्ही पूल पाण्याखाली गेले होते. मात्र, मंगळवारी सकाळी दहा वाजल्यापासून पूर ओसरण्यास सुरुवात झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.
उद्या बुधवारी (दि. ८ जुलै) दुपारी तीन वाजता माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. प्रस्थान झाल्यानंतर रात्री पालखी आळंदीतीलच आजोळघरी मुक्कामी असेल. त्यानंतर गुरुवारी (दि. ९ जुलै) सकाळी सहाच्या सुमारास पालखी पुण्याच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. पालखी सोहळा सुलभतेने पार पडण्यासाठी गुरुवारपर्यंत शहरातील पूल वाहतुकीसाठी खुले असणे अत्यंत गरजेचे आहे. अद्याप हातात दोन दिवसांचा अवधी असल्याने गुरुवारपर्यंत हे पूल सुरक्षितपणे वाहतुकीसाठी खुले होतील, असा अंदाज प्रशासनाला आहे.
तसे न झाल्यास आणि पुन्हा पाणी वाढून पूल पाण्याखालीच राहिल्यास पर्यायी मार्गाचा वापर केला जाईल. त्यानुसार इंद्रायणी नदीवरील चऱ्होली खुर्द ते चऱ्होली बुद्रुकला जोडणारा नवीन पूल, चऱ्होली बायपास रस्ता आणि चऱ्होली फाटामार्गे पालखी पुढे 'थोरल्या पादुका मंदिर' येथे सकाळच्या विसाव्यासाठी पोहोचू शकेल. हा पर्यायी मार्ग आळंदी देवस्थानच्या विचाराधीन आहे. उद्या बुधवारची पूरपरिस्थिती पाहूनच यावर अधिकृत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती आळंदी देवस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांनी 'पुढारी'शी बोलताना दिली.
दुसरीकडे, शहरातील पूर ओसरू लागल्याने आळंदी नगरपालिकेने तातडीने स्वच्छता मोहीम हाती घेत राडारोडा हटविण्यास सुरुवात केली आहे. इंद्रायणी पुलावर वाहून आलेली आणि अडकलेली जलपर्णी काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच पुलाचे तुटलेले कठडे दुरुस्त करण्याचे नियोजन केले जात आहे. पालखी सुरक्षितपणे मार्गस्थ करण्यासाठी पोलीस प्रशासनही सज्ज झाले असून, मंगळवारी देऊळवाड्यात देवस्थान आणि पोलीस प्रशासनाची एक तातडीची बैठक पार पडली. या बैठकीत सुरक्षा व वाहतूक नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
एकीकडे इंद्रायणी नदीचे पाणी ओसरू लागले असले, तरी धरण क्षेत्र आणि मावळ परिसरात मुसळधार पाऊस सुरूच आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली असून नदीला पुन्हा पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर, पालखी सोहळ्याच्या दृष्टीने पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत.