

सासवड: मांडकीतील शेतकर्याची आधारकार्ड लिंक करण्याच्या नावाखाली सहा एकर जमीन लाटण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी किरण आनंदा भंडलकर (रा. मांडकी ता. पुरंदर), सौरभ दादा शितोळे (रा. साखर कारखान्याजवळ कासारसाई, पुणे) यांच्यावर सासवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रूपाली नरेंद्र जाधव (रा. मांडकी, ता. पुरंदर) यांनी फिर्याद दिली आहे.
रूपाली जाधव यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, पती नरेंद्र जाधव व दीर दौलत ज्ञानेश्वर जाधव यांच्या नावावर मांडकी येथे वडिलोपार्जित गट. क्र. 896 मध्ये प्रत्येकी 80 आर असे एकूण 160 आर क्षेत्र आहे. व गट क्र. 308/2 मध्ये प्रत्येकी 45 असे एकूण 90 आर क्षेत्र आहे. पती व दीर यांचे दोन्ही गटातील एकूण क्षेत्र 6 एकर 10 गुंठे आहे. दीर हे अविवाहीत असून, ते गेले 6 वर्षांपासून घर सोडून निघुन गेले आहेत, ते अद्यापर्यंत घरी आलेले नाहीत. पतीस दारूचे व्यसन आहे. ते सतत दारूच्या नशेत असतात. (Latest Pune News)
पती व आमच्या गावातील गणेश तात्याबा रांजणे हे जवळचे मित्र आहेत. गणेश रांजणे यांनी पतीची आणि किरण भंडलकरची काही दिवसापूर्वी ओळख करून दिली होती. त्यामुळे पती नरेंद्र जाधव, गणेश रांजणे व किरण भंडलकर यांची चांगली मैत्री आहे.
पती व ते दोघेजण अधुनमधुन एकत्र दारू पित असायचे 18 व 19 जून रोजी गणेश रांजणे यांनी त्यांच्या चारचाकी गाडीमधून पती नरेंद्र जाधव यांच्याकडे काम आहे, असे सांगून, गाडीमध्ये घेऊन गेले. पतीस दोन दिवस दारूच्या नशेत रात्री उशिरा घरी सोडले होते.
त्यानंतर 20 जून रोजी गणेश रांजणे हे म्हणाले की, नरेंद्र जाधव व आम्ही दारूची पार्टी करायला जाणार आहे. पतीला दारूच्या नशेत रात्री उशिरा घरी सोडले. 21 जून रोजी पतीला विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, काल मला गणेश रांजणे, राजेंद्र शिंदे, किरण आनंदा भंडलकर व त्याचा मित्र सौरभ दादा शितोळे हे त्यांच्या चारचाकी गाडीमध्ये जेजुरी येथे महाराजा हॉटेलवर घेऊन गेले होते. तेथे सर्व जण दारू पिले. त्यानंतर मला सासवड येथे घेऊन आले. तुझे आधारकार्ड लिंक करायचे आहे, असे म्हणून त्यांनी माझी 4 ते 5 ठिकाणी सही घेतली. मी पूर्ण दारूच्या नशेत होतो. मला काही एक समजत नव्हते.
20 जून रोजी तुझे वडिलांनी तुमची मांडकी येथे असलेल्या जमिनीचे साठेखत व कुलमुखत्यार दस्त करून दिलेले आहे. यापुढे तुम्ही शेतात जायचे नाही, अशी जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर मी व मुलगा आम्ही दुय्यम निबंधक कार्यालय, सासवड येथे जाऊन चौकशी केली असता, माझे पती व दीर दौलत ज्ञानेश्वर जाधव यांच्या नावे असलेल्या मांडकी येथील वडिलोपर्जित शेतजमीन गट क्र. 896 मधील 160 आर क्षेत्राचे साठेखत दस्त क्र. 6495/2025 व कुलमुखत्यारपत्र दस्त क्र. 6496/2025 व गट क्र. 308/2 मधील 90 आर क्षेत्राचे साठेखत दस्त क्रमांक 6497/2025 व कुलमुखत्यारपत्र दस्त क्र. 6498/2025 20 जून रोजी किरण आनंदा भंडलकर व सौरभ दादा शितोळे यांच्या नावे केल्याचे समजले.
दस्तामध्ये नमूद केलेली रोख रक्कम पती यांना दिलेली नाही. दस्तामध्ये नमूद केलेले कोणतेही चेक माझे पती यांना दिले नाहीत. तसेच माझे दीर दौलत जाधव हे गेले 5 ते 6 वर्ष परागंदा झालेले असतानादेखील त्यांच्याही नावे असलेल्या क्षेत्राचे बेकायदेशीर साठेखत व कुलमुखत्यारपत्र करून आरोपी यांनी त्यांचे नावे करून घेतले आहे. तसेच दस्तावर नमूद केलेली रोख रक्कम माझे पती व मला दिली नसून, दस्तातील नमूद चेकदेखील माझे पती अगर मला दिले नाहीत. आमची फसवणूक केली आहे.
सासवड शहर आणि ग्रामीण भागात बेकायदेशीररित्या जमीन लाटली असेल तर त्यांची नावे व माहिती सासवड पोलिसांना कोणतीही भीती न बाळगता द्यावी. दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल.
- ऋ षिकेश अधिकारी, पोलिस निरीक्षक, सासवड