

शंकर कवडे
पुणे: पुणे विभागातील बहुतांश ठिकाणच्या भेंडी आणि गवारची तोडणी उरकल्याने गुलटेकडी मार्केट यार्डातील तरकारी विभागात या फळभाज्यांची आवक घटली आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी पडल्याने भेंडी आणि गवारच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. दुसरीकडे, ढगाळ वातावरणामुळे फ्लॉवरच्या उत्पादनात वाढ झाली असून, परराज्यांतून मटारची आवक दुप्पट, तर कोबीचीही आवक वाढली आहे. वाढत्या आवकेच्या तुलनेत मागणी कमी राहिल्याने फ्लॉवर, मटार आणि कोबीच्या भावात दहा टक्क्यांनी घसरण झाली आहे. उर्वरित फळभाज्यांचे दर मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर राहिले. रविवारी (दि. २२) बाजारात राज्यासह परराज्यांतून सुमारे १०० ट्रक शेतमालाची आवक झाली होती.
परराज्यांतून झालेल्या आवकमध्ये बंगळुरू येथून ३ टेम्पो, कर्नाटक, गुजरात, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशातून हिरवी मिरची २० ते २२ टेम्पो, कर्नाटकातून कोबी ५ ते ६ टेम्पो, घेवडा २ ते ३ टेम्पो, राजस्थानातून गाजर ७ ते ८ टेम्पो, पंजाब, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेशातून मटार २५ ते २८ ट्रक, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूतून शेवगा ५ ते ६ टेम्पो, कर्नाटकातून भुईमूग ३ टेम्पो, पावटा २ टेम्पो, तमिळनाडूतून तोतापुरी कैरी १०० क्रेट, मध्य प्रदेशातून लसूण ८ ते १० टेम्पो, तर इंदूर, आग्रा आणि स्थानिक भागातून बटाट्याची ५० टेम्पो आवक झाली.
स्थानिक भागातून झालेल्या आवकेत सातारी आले ३०० ते ३५० गोणी, भेंडी ४ ते ५ टेम्पो, गवार ३ ते ४ टेम्पो, टोमॅटो १२ ते १४ हजार क्रेट, हिरवी मिरची ५ ते ६ टेम्पो, काकडी ४ ते ५ टेम्पो, फ्लॉवर १० ते १२ टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, गाजर ३ ते ४ टेम्पो, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, घेवडा ३ ते ४ टेम्पो, पावटा २ टेम्पो, तर नवीन आणि जुन्या कांद्याची सुमारे १२५ टेम्पो आवक झाली.
फळभाज्यांचे दहा किलोचे भाव (रुपयांत) : कांदा : ३५०-४२०, बटाटा : ८०-२००, लसूण : ९००-२३००, आले (सातारी) : ५००-६००, भेंडी : ३००-५००, गवार : ६००-८००, टोमॅटो : ८०-१४०, दोडका : ३००-३५०, हिरवी मिरची : २५०-३००, दुधी भोपळा : १००-२००, चवळी : २००-२५०, काकडी : ३००-३५०, कारली हिरवी : २००-२५०, पांढरी : १८०-२००, पापडी : ३५०-४००, पडवळ : १५०-२००, फ्लॉवर : ६०-८०, कोबी : ४०-६०, वांगी : २००-३५०, डिंगरी : ४००-४५०, नवलकोल : ५०-६०, ढोबळी मिरची : ४५०-५००, तोंडली कळी : ४५०-५००, जाड : २००-२५०, शेवगा : ४००-५००, गाजर : २५०-३००, परराज्यांतील गाजर : ४००-५००, वालवर : ३५०-४००, बीट : १२०-१४०, घेवडा : ५००-६००, कोहळा : १००-१५०, आर्वी : २५०-३००, घोसावळे : २००-२५०, ढेमसे : २५०-३००, भुईमूग शेंग : ८००-९००, मटार : ३५०-६००, पावटा : ९००-१०००, तांबडा भोपळा : १००-१५०, तोतापुरी कैरी : १०००-११००, सुरण : १८०-२८०, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.
कोथिंबीर, मेथीची आवक लाखांवर
पोषक वातावरणामुळे उत्पादनात वाढ झाल्याने गुलटेकडी मार्केट यार्डात पालेभाज्यांची आवक वाढली आहे. रविवारी (दि. २२) कोथिंबिरीच्या सुमारे दोन लाख, तर मेथीच्या एक लाख जुड्यांची आवक झाली. गत आठवड्याच्या तुलनेत कोथिंबिरीची आवक ५० हजार, तर मेथीची २० हजार जुड्यांनी वाढली. कोथिंबिरीची प्रामुख्याने पुणे जिल्हा आणि लातूर येथून, तर मेथीची पुणे आणि जालना येथून मोठ्या प्रमाणात आवक झाली. आवक वाढूनही दर्जेदार कोथिंबिरीच्या जुडीला दहा रुपये, तर मेथीला बारा रुपयांपर्यंत दर मिळाला. दरम्यान, बाजारात कोवळ्या हरभऱ्याचीही आवक सुरू झाली असून, रविवारी सुमारे एक हजार जुड्या दाखल झाल्या. उर्वरित पालेभाज्यांचे दर गत आठवड्याच्या तुलनेत स्थिर राहिल्याची माहिती पालेभाज्यांचे अडतदार राजेंद्र सूर्यवंशी यांनी दिली.
पालेभाज्यांचे शेकडा जुड्यांचे भाव (रुपयांत) : कोथिंबीर : ५००-१०००, मेथी : १०००-१२००, शेपू : १२००-१५००, कांदापात : १०००-१५००, चाकवत : १०००-१२००, करडई : ८००, पुदिना : ४००-५००, अंबाडी : ८००-१०००, मुळे : १२००-२०००, राजगिरा : ६००-८००, चुका : ५००-७००, चवळई : ५००-७००, पालक : ८००-१०००, हरभरा : १३००.