

Pune University exam form last date
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने हिवाळी सत्र परीक्षांच्या अर्ज भरण्याच्या वेळापत्रकात बदल केला आहे. त्यानुसार नियमित शुल्कासह विद्यार्थ्यांना २४ सप्टेंबरपर्यंत, तर अतिविलंब शुल्कासह विद्यार्थ्यांना २९ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.
हिवाळी सत्राच्या परीक्षेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया विद्यापीठाने १५ सप्टेंबरपासून सुरू केली आहे. विद्यापीठाने सात वर्षांनी परीक्षा शुल्कात वाढ केली आहे. डॉ. देसाई यांनी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार, नियमित शुल्कासह विद्यार्थ्यांना २४ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. महाविद्यालयांना विद्यार्थ्यांचे अर्ज २५ सप्टेंबरपर्यंत अंतिम करावे लागणार आहेत.
विलंब शुल्कासह विद्यार्थ्यांना २६ सप्टेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे. त्यानंतर महाविद्यालयांना २७ सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांचा अर्ज अंतिम करावा लागणार आहे. तर अतिविलंब शुल्कासह विद्यार्थ्यांना २९ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार असून, महाविद्यालयांना ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज अंतिम करावा लागणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.