

पुणे: नववर्षाचे स्वागत सहसा मटण, मासळी आणि चिकनच्या चवीने केले जाते. मात्र, यंदा भागवत एकादशीमुळे पुणेकरांच्या सामिष मेजवानीवर विराम लागला. परिणामी, हॉटेल व्यावसायिक वगळता घरगुती ग््रााहकांकडून मटण, मासळी आणि चिकनला अपेक्षेपेक्षा कमी मागणी नोंदविण्यात आली. मागणीच्या तुलनेत आवक कमी राहिल्याने चिकनच्या दरात किलोमागे 20 रुपये तर मटणाच्या दरात किलोमागे 40 रुपयांनी वाढ झाली. इंग्लिश अंड्याच्या दरात शेकड्यामागे 50 रुपयांनी घट झाली.
मार्गशीर्ष महिन्यात श्री महालक्ष्मी वतामुळे अनेक कुटुंबांत सामिष भोजन वर्ज्य केले जाते. मार्गशीर्ष संपल्यानंतर पौष महिन्याची सुरुवात झाली. पौष महिन्यातील रविवारी (दि. 28) सामिष पदार्थांना चांगली मागणी होती. विशेषतः नववर्षाच्या आदल्या दिवशी मटण, मासळी व चिकनची मोठी उलाढाल होत असते. मात्र, यंदा 31 डिसेंबर रोजी एकादशी आल्याने सामिष खवय्यांचा हिरमोड झाला.
नववर्षाच्या स्वागतासाठी घरगुती पातळीवर होणारी मटण, मासळी व चिकनची खरेदी लक्षणीयरीत्या घटली. गणेश पेठेतील मासळी बाजार, कसबा पेठेतील मटण मार्केट, लष्कर परिसरातील श्री छत्रपती शिवाजी मार्केट, कर्वे रस्त्यावरील मटण बाजार, फर्ग्युसन रस्त्यावरील वीर चापेकर मार्केट, तसेच पौड फाटा, विश्रांतवाडी आणि पद्मावती येथील मासळी बाजारात खरेदीसाठी फारशी गर्दी दिसून आली नाही.
यासंदर्भात पुणे शहर मटण दुकानदार असोसिएशनचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनी सांगितले, नववर्षानिमित्त मटण, मासळी व चिकनला नेहमीच मोठी मागणी असते. मात्र, बुधवारी (दि. 31) एकादशी असल्याने घरगुती ग््रााहकांकडून मटणाची मागणी अत्यल्प राहिली. हॉटेल व्यावसायिकांकडूनच बेताची खरेदी झाली. याचदरम्यान मटणाच्या दरात किलोमागे 40 रुपयांची वाढ झाली आहे.
दरम्यान, गणेश पेठेतील मासळी बाजारात खोल समुद्रातील मासळीबरोबरच आंध प्रदेशातून आलेली रहू, कतला, सीलन मासळी, नदीतील तसेच खाडीतील मासळीची आवक झाली होती. मात्र, नेहमीच्या तुलनेत खरेदी कमीच राहिली. पापलेट, कोळंबी, सुरमई, रावस, हलवा आणि ओले बोंबील या मासळीला खवय्यांची पसंती होती, अशी माहिती व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली.