

कसबा मतदारसंघ
नव्या प्रभागरचनेत मध्यवस्तीत फारसे बदल झालेले नाहीत. त्यामुळे पारंपरिक उमेदवारांंमधील ‘कांटे की टक्कर’ अनुभवायला मिळणार की नव्या चेहर्यांना संधी मिळणार, यावरच कसबा विधानसभा मतदारसंघातील साडेचार प्रभागांमधील महापालिकेची निवडणूक रंगणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
कसबा विधानसभा मतदारसंघातील प्रभागांमध्ये 10 ते 15 टक्के एवढाच बदल करण्यात आला आहे. यामध्ये दोन प्रभागांमध्ये कॅन्टोन्मेंटचा काही भाग जोडण्यात आला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी नव्याने उभे राहणार्या इच्छुकांसमोर काही प्रमाणात आव्हान निर्माण होणार आहे; परंतु ज्या प्रभागांमध्ये काहीच बदल झालेला नाही, त्या ठिकाणी मात्र पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्येच रंगतदार लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या मतदारसंघातील प्रभाग हे कमी लोकसंख्येचे आहेत. त्यामुळे त्याच त्याच चेहर्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Latest Pune News)
प्रभाग क्रमांक 25 मधील हेमंत रासने आता आमदार झाले आहेत, तर 2017 ला देखील दिवंगत आमदार मुक्ता टिळक या ठिकाणाहून निवडून आल्या. त्यामुळे त्यांच्या जागेवर आता नेमकी कुणाला संधी मिळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या ठिकाणी भाजपचे प्राबल्य असले तरी इच्छुकांची भाऊगर्दी मोठ्या प्रमाणात आहे. भाजपकडून मिळालेली उमेदवारी हाच या ठिकाणी विजयाचा मार्ग असल्याचे सांगण्यात येत आहे.
प्रभाग क्रमांक 24 कमला नेहरू हॉस्पिटल - रास्ता पेठ या परिसरात रवींद्र धंगेकरांचे प्राबल्य जास्त आहे. त्यामुळे ते स्वत: या ठिकाणी उभे राहणार की त्यांच्या घरातील अन्य कोणाला संधी देणार यावर देखील या ठिकाणची निवडणूक चुरशीची ठरणार आहे. गणेश बिडकर यांचे देखील येथे मोठे प्रस्थ आहे. त्यामुळे त्यांचे जवळचे नातेवाईक किंवा धंगेकर -बिडकर यांच्यातसुद्धा ‘कांटे की टक्कर’ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्रभाग क्रमांक 25 मध्ये शनिवार पेठ, नारायण पेठ, शुक्रवार पेठ (पार्ट), सुभाष नगर, माडीवाले कॉलनी, शनिवार वाडा, महात्मा फुले मंडई, नूतन मराठी विद्यालय, सदाशिव पेठ (पार्ट), राजा दिनकर केळकर संग्रहालय, कबीर बाग, अहिल्यादेवी हायस्कूल मुलींची, हुजूरपागा, न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग, तुळशीबाग, शनिपार, रेणुका स्वरूप शाळा, भावे हायस्कूल, भरत नाट्य मंदिर, टेलिफोन एक्सचेंज (बाजीराव रोड) आदी परिसर येतो, तर प्रभाग क्रमांक 23 मध्ये बुधवार पेठ, रास्ता पेठ, रविवार पेठ, नाना पेठ, टिळक आयुर्वेद महाविद्यालय, ताराचंद हॉस्पिटल, गणेश पेठ, दारूवाला पूल परिसर, गणेश पेठ दूध बाजार, के. सी. ठाकरे विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम, पालखी विठोबा चौक परिसर, रविवार पेठ आदी परिसर येत आहे. यातील काही भागात किरकोळ बदल झाला आहे.
त्यामुळे फारसा बदल नसलेल्या कसबा मतदारसंघात पूर्वीपासूनच भाजपचे वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे याठिकाणी भाजपचेच वर्चस्व राहणार की जनता नवीन पर्याय शोधणार हे येत्या महापालिका निवडणुकीतच स्पष्ट होणार आहे.
प्रभाग क्र. 27 - नवी पेठ-पर्वतीचा निम्मा भाग हा पर्वती विधानसभा मतदारसंघातील
प्रभाग 28 - जनता वसाहत- हिंगणे खुर्दसोबत जोडला आहे.
अशी आहे प्रभागरचना
प्रभाग क्रमांक प्रभागाचे नाव
23 रविवार पेठ - नाना पेठ
24 कमला नेहरू हॉस्पिटल - रास्ता पेठ
25 शनिवार पेठ - महात्मा फुले मंडई
26 गुरुवार पेठ - घोरपडे पेठ
27 नवी पेठ - पर्वती
खडकवासला मतदारसंघ
पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकतीच नवी प्रभागरचना जाहीर झाली आहे. ग्रामीण व शहरी भागांचा संगम असलेल्या या प्रभागात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर शहरीकरण झाले आहे. नव्या मतदारांची भर पडल्याने निवडणूक गणिते बदलली आहेत. समाविष्ट गावांतील इच्छुकांची संख्या जास्त असल्याने मतांच्या विभागणीचा फटका बसू शकतो. ऐनवेळी तिकीट कोणाला मिळणार, कोण कोणत्या पक्षातउडी मारणार, हे पाहणे औत्सुक्याचेठरणार आहे.
खडकवासला मतदारसंघात नर्हे - वडगाव बुद्रुक हा भौगोलिकदृष्ट्या आणि लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वांत मोठा प्रभाग ठरला आहे. मतदारसंघात प्रभाग क्र. 30, 32, 34, 35, 37 आणि 38 यांचा समावेश आहे. खडकवासला मतदारसंघात पूर्वीपासून भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्राबल्य राहिले आहे. महापालिका निवडणुकांमध्ये सध्यातरी या पक्षांचे वर्चस्व पहायला मिळण्याची शक्यता आहे.
खडकवासला प्रभाग हा परंपरेने राष्ट्रवादी काँग्रेसचा गड मानला जातो. मात्र, गेल्या दोन निवडणुकांपासून भाजपने शहरी भागातील मतदारांमध्ये पकड मजबूत केली आहे. विशेषतः नव्याने उभारलेल्या गृहनिर्माण वसाहती, मध्यमवर्गीय व उच्च मध्यमवर्गीय मतदार हे भाजपकडे झुकले आहेत.
दरम्यान, काँग्रेसचा प्रभाव तुलनेने कमी झाला असला, तरी दलित व अल्पसंख्याक मतदारसंघांमध्ये त्यांचा पाया अजून मजबूत आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांचे अस्तित्व इथे नाममात्र आहे मात्र, मराठी मतदारांमध्ये प्रभाव टाकण्याची ताकद त्यांच्याकडे आहे. नवे मतदार व तरुण वर्ग कोणाकडे झुकतो, यावर अंतिम निकाल ठरण्याची शक्यता आहे.
नवीन प्रभाग रचनेनुसार, खडकवासला धरण परिसर, आर्मी कॅम्प परिसर, तसेच वडगाव-धायरी पट्ट्यातील गृहनिर्माण वसाहती या सर्वांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे लष्करी कर्मचारी, सेवानिवृत्त, तसेच मोठ्या प्रमाणावर नवे शहरी मतदार हे निर्णायक ठरणार आहेत. नवे मतदार आणि शहरीकरणाचा वेग हेच येथे निर्णायक घटक ठरणार असून, महापालिका निवडणुकीत या प्रभागाकडे संपूर्ण पुण्याचे लक्ष लागले आहे.
नाराजीनाट्यामुळे बिघडणार राजकीय गणिते!
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांची संख्या भाजपामध्ये जास्त आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची बलाबलही प्रभावी आहे. त्यामुळे तिकीट कोणाला द्यायचे, नाराजीनाट्य झाल्यास ऐनवेळी कोण कोणत्या पक्षात जाणार, यावर पुढील समीकरणे ठरणार आहेत.
अशी आहे प्रभागरचना
प्रभाग क्रमांक प्रभागाचे नाव
30 कर्वेनगर-हिंगणे होम कॉलनी
32 वारजे-पॉप्युलरनगर
34 नर्हे - वडगाव बुद्रुक
35 सनसिटी - माणिक बाग
37 धनकवडी - कात्रज डेअरी
38 आंबेगाव