पुणे: केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या व कामगार कायद्यांच्या विरोधात देशातील कामगार संघटनेने बुधवारी (दि. 9) देशव्यापी संप पुकारला आहे. या संपाचा दूरगामी परिणाम विविध सेवांवर होण्याची शक्यता आहे. बँकिंग, खाणकाम, पोस्टल सर्व्हिस, बांधकाम यासह विविध क्षेत्रांतील कामगार या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. शहरातील विविध संघटना देखील या संपात सहभागी होणार असून, केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात येणार आहे.
बुधवारी घोषित करण्यात आलेल्या देशव्यापी संपात 10 प्रमुख कामगार संघटनांनी सहभाग घेतला आहे. या संघटनांच्या संबंधित इतर कामगार संघटनाही या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. (Latest Pune News)
केंद्र सरकारने कामगारविरोधी, शेतकरीविरोधी धोरण अवलंबल्याचा आरोप या कामगार संघटनांनी केला असून सरकारच्या या धोरणांचा फायदा केवळ उद्योगपतींना, त्यांच्या उद्योगांना होणार असल्याचा आरोपदेखील त्यांनी केला आहे. शहरी भागांसह ग्रामीण भागातील कामगारही या बंदमध्ये सहभागी होणार असल्याचे कामगार संघटनांनी स्पष्ट केले आहे. अनेक अत्यावश्यक सेवा बंद राहण्याची शक्यता असल्याने त्याचा परिणाम सर्वसामान्य लोकांवर होण्याची शक्यता आहे.
सहकारी बँका सुरू, राष्ट्रीय बँका बंद
पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष मोहिते म्हणाले, राष्ट्रीय बँकांनी संप पुकारलेला आहे. यात नागरी सहकारी बँकांचा संबंध नाही. सहकारी बँकांचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरळीत राहील.
कामगार नेते विश्वास उटगी म्हणाले, भारतीय जनता पक्ष प्रणित भारतीय मजदूर संघ वगळता सर्व कामगार संघटना यात सहभागी आहेत. बँकांच्या खासगीकरणा विरोधात, कामगारविरोधी कायदे रद्द करण्यासाठी इतर सर्व कामगार संघटना संपात उतरल्या आहेत. त्यामुळे संप कडकडीत पाळला जाईल.
शाळा, महाविद्यालये सुरूच राहणार
केंद्रीय कामगार संघटनांनी बुधवारी पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर शाळा-महाविद्यालये बंद राहणार का, याबाबत पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु, संप जरी असला तरी शाळा-महाविद्यालये सुरळीत सुरू राहणार आहेत. संपाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारची सुटी शाळा-महाविद्यालयांना देण्यात आली नसल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकार्यांनी दिली आहे.
महावितरणच्या 6 कर्मचारी संघटना होणार संपात सहभागी
महावितरणच्या 23 पैकी 6 कर्मचारी संघटनांनी बुधवारी देशव्यापी संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. संपकाळात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणकडून आपत्कालिन नियोजन पूर्ण झाले असून राज्यभरातील यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी वीजपुरवठ्याबाबत कोणत्याही नकारात्मक व चुकीच्या संदेशावर विश्वास ठेवू नये.
वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी पर्यायी यंत्रणा 24 तास युद्धपातळीवर सज्ज राहणार आहे. वीजपुरवठ्याबाबत काही तक्रारी किंवा शंका असल्यास 24 तास सुरू असलेल्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा व संपाच्या कालावधीत सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र व संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी वीज ग्राहकांची गैरसोय होऊ नये यासाठी संप टाळण्याचे आवाहन केले.
आशा वर्कर्सही आज उतरणार रस्त्यावर
गेल्या तीन महिन्यांपासून रखडलेला मोबदला, महागाई भत्त्याशी जोडून किमान वेतन रु 26000 आणि रु. 10000 मासिक पेन्शन, पी. एफ. इत्यादि सामाजिक सुरक्षा अशा विविध मागण्यांसह जनसुरक्षा विधेयकाला विरोध दर्शवण्यासाठी पुण्यातील आशावर्कर्सही बुधवारी (दि. 9) रस्त्यावर उतरणार आहेत. जिल्ह्यातील सर्व आशा वर्कर्स दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करणार आहेत.
याबाबत माहिती देताना आशा वर्कर्स युनियन, पुणे जिल्हा (सीटू) सचिव किरण मोघे म्हणाल्या कामगार विरोधी चार श्रमसंहितासह ‘जनसुरक्षा विधेयक’ मागे घ्यावे, या मागणीसाठी देशातील 10 केंद्रीय कामगार संघटनांकडून कामगारांचा देशव्यापी संप होणार आहे. त्या संपाला पाठिंबा देण्यासह विविध मागण्यांसाठी आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका यांसह विविध क्षेत्रातील कामगारवर्गांकडून धरणे आंदोलन केले जाणार आहे.