

पुणे : 'आम्ही झोपलो होतो. त्यावेळी माझ्या आत्याला आगीच्या झळांमुळे जाग आली. तिने ओरडून आम्हाला जागे केले. आगीचे लोळ पाहून आम्ही घराबाहेर पळालो, अन् त्यामुळे आमचा जीव वाचला…' सुमारे अठरा वर्षे वयाची साक्षी लडकत पुढारीला सांगत होती.
ती म्हणाली, 'आमच्या घरात 20 जण आहेत. आम्ही सर्व रात्री झोपलो होतो.
अचानक पहाटे आत्याच्या ओरडण्याचा आवाज आला आणि त्यामुळे मला जाग आली. आग-आग असा ओरडा सुरू होता. मी बाहेर पाहिले तर आगीचे मोठे लोळ दिसत होते. धावत आम्ही सर्वजण खाली आलो. तेवढ्यात घरातल्या गॅस सिलिंडरची कुणालातरी आठवण झाली आणि पुन्हा घरात जाऊन घाईघाईने सिलिंडर बाहेर काढला. आमचा जीव वाचला, पण आगीत घरातले सामान जळून खाक झाले आहे.'
गोडाऊनला लागून मोठी मानवी वस्ती आहे. आगीत काही घरांचे नुकसान झाले आहे. वेळीच जर अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवून नागरिकांना बाहेर काढले नसते तर मोठा अनर्थ झाला असता. वस्तीतील रस्ते अरुंद आहेत. शिवाय घरेदेखील जवळजवळ आहेत. येथे आग पसरली असती तर अवघड झाले असते.
शाळेला आगीची झळ लागल्याचे समजताच काही शिक्षिकांनी शाळेत धाव घेतली. त्यांची स्टाफ रूम जळून खाक झाली होती. कोणाची प्रशिक्षणाची कागदपत्रे तर कोणाचे इतर महत्त्वाचे साहित्य जळाल्याची त्या चर्चा करत होत्या.
'मी कुरिअरचा व्यवसाय करतो. माझे हातावरचे पोट आहे. आग लागली तेव्हा मी आणि माझी पत्नी घरात झोपलो होतो. पावणेचार वाजता माझ्या एका मित्राने मला उठवून घराबाहेर काढले. त्यानेच मला मोठी आग लागल्याचे सांगितले.
घरातला सिलिंडर घेऊन आम्ही बाहेर पळालो. आगीत घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. आता आम्ही कसे जगायचे ?' असा टाहो संतोष गायकवाड यांनी फोडला.
वर्दी मिळताच मी पहिल्यांदा माझ्या जवानांसोबत बंब घेऊन दाखल झालो. आगीची तीव्रता एवढी मोठी होती की, जवळ जाता येत नव्हते. माझ्या सहकार्यांनी आगीवर पाण्याचा मारा करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी माझ्या लक्षात आले की, ही आग लवकर नियंत्रणात येणार नाही. तत्काळ मी ब्रिगेड कॉल दिला. त्यानंतर पुणे, पिंपरी-चिंचवड, पीएमआरडीए तसेच कॅन्टॉन्टमेंट बोर्डाचे सर्व बंब, पाण्याचे टँक दाखल झाले.
नागरिकांचे प्राण वाचवणे हे आमचे मुख्य ध्येय होते. त्यासाठी आम्ही पाण्याचे दोन पाईप टाकून काम करण्यास सुरुवात केली. पहिले लक्ष होते शेजारी वस्तीपर्यंत आग पोहचू न देणे आणि तिथल्या नागरिकांना घरातून सुखरूप बाहेर काढणे. दुसरे लक्ष होते आगीवर नियंत्रण मिळवणे. गोडाऊनला लागून असलेल्या काही घरांना आगीची मोठी झळ लागली. तेथे नागरिक झोपेत होते. त्यांना उठवून आम्ही बाहेर काढले. तसेच घरातील सिलिंडर प्रथम सुरक्षित ठिकाणी हलवले.
– प्रदीप खेडेकर,
अग्निशमन अधिकारी.