

पुणे: शहरासह परिसरात तापमानात लक्षणीय वाढ झाल्याने उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. सकाळपासूनच कडक उन्हामुळे नागरिक हैराण झाले असून, दुपारच्या सुमारास रस्त्यांवरील वर्दळ कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. दुपारच्या वेळेत उन्हाची तीवता अधिक असल्याने अनेकांनी घराबाहेर पडणे टाळले. परिणामी प्रमुख चौकांमध्ये आणि बाजारपेठांमध्ये वाहतूक तुलनेने मंदावलेली दिसून आली.
पुणे शहर आणि परिसराचा तापमानाचा पारा फेबुवारी महिन्याच्या अखेरीस 34 ते 35 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. त्यामुळे सकाळी दहा वाजल्यापासूनच उन्हाचे चटके जाणविण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे अत्यावश्यक कामांसाठी बाहेर पडणारे नागरिकही डोक्यावर टोपी, स्कार्फ, छत्री यांचा वापर करताना दिसून आले आहेत.
उष्णतेचा वाढता पारा लक्षात घेता नागरिकांचा थंड पेये, लिंबूपाणी, उसाचा रस, ताक आणि विविध शीतपेये यांकडे कल वाढला आहे. शहरातील ज्यूस सेंटर, थंड पेयांची दुकाने आणि आइस्क्रीम विक्रेत्यांकडे ग््रााहकांची गर्दी वाढलेली दिसून येत आहे. दरम्यान, उन्हाळ्याची चाहूल लागताच हंगामी फळेही बाजारात दाखल झाली आहेत. कलिंगड, खरबूज, द्राक्षे, यांसारखी फळे रस्त्याच्या कडेला विक्रीसाठी उपलब्ध झाली असून, नागरिक त्यांची खरेदी करताना दिसत आहेत. आरोग्य तज्ज्ञांनी नागरिकांना भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला असून, दुपारच्या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन केले आहे.