

पुणे : पोर्शे कार भरधाव चालवून तरुण-तरुणीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाचा गुन्हा अंगावर घेण्यासाठी वाहनचालकाला धमकावले. व त्याला बंगल्यात डांबून ठेवल्याप्रकरणात अटकेत असलेल्या सुरेंद्रकुमार ब्रह्मदत्ता अगरवाल (वय ७७) आणि विशाल सुरेंद्रकुमार अगरवाल (वय ५०) या दोघांचा जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर केला.
आठवड्यातून दोन वेळा पोलिस ठाण्यात हजेरी लावावी, जिल्ह्याची हद्द सोडून बाहेर जाऊ नये, तसेच पासपोर्ट पोलिसांकडे जमा करावा आणि साक्षीदारांवर दबाव आणू नये या अटी-शर्तींसह 50 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. एस. बारी यांच्या न्यायालयाने जामीन दिला. न्यायालयाच्या आदेशामुळे तब्बल 37 दिवसांनी सुरेंद्रकुमार अगरवाल कारागृहाबाहेर येणार आहे. मात्र, विशाल अगरवालच्या मागे गुन्ह्यांचे शुक्लकाष्ठ अद्याप कायम असून, बावधन परिसरातील सदनिकाधारकांची फसवणूक केल्याप्रकरणी त्याची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली आहे. गुन्ह्यात येरवडा कारागृहात रवानगी झाल्यानंतर त्यांनी जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील योगेश कदम आणि बचाव पक्षातर्फे अॅड. प्रशांत पाटील यांनी बाजू मांडली.