

जळगाव : तालुक्यातील नशिराबाद गावात एका भागात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून विनयभंग केल्याची घटना सोमवारी (दि.१) समोर आली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना पोलिसांनी अटक केली. गौरव विकास गोसावी आणि शेख रेहान शेख बबलू अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, नशिराबाद गावातील एका भागात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह राहते . सोमवारी (दि.१) सायंकाळी पाचच्या सुमारास ही मुलगी आपल्या मैत्रिणीसोबत गावातील शाळेजवळून जात होती. यावेळी गौरव गोसावी आणि रेहान शेख या दोघांनी या मुलीचा पाठलाग करून त्यांचा विनयभंग केला. दरम्यान याप्रकरणी पीडित मुलीने हा प्रकार तिच्या नातेवाईकांना सांगितला. नातेवाईकांनी नशिराबाद पोलीस ठाण्यात धाव घेत याप्रकरणी तक्रार दाखल केली. त्यानुसार या दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश घायतळ हे करीत आहे.