

पुणे: केंद्र सरकारने जरी वाढीव पाच लाख मेट्रिक टन साखर निर्यातीचा कोटा दिला असला, तरी प्रत्यक्षात साखर निर्यात अशक्य असल्याची स्थिती आहे. कारण, जागतिक बाजारापेक्षा देशांतर्गत बाजारातच साखरेचे दर अधिक असल्यामुळे निर्यातीचा कोटा वाढविण्याचा फारसा फायदा कारखान्यांना होणार नसल्याची माहिती वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे (विस्मा) अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी दिली.
ते म्हणाले, केंद्र सरकारने यापूर्वी घोषित केल्यानुसार देशातून 15 लाख मे. टन साखर निर्यातीला परवानगी दिलेली आहे. त्यामधील 50 टक्के साखरसुद्धा अद्याप निर्यात होऊ शकलेली नाही. त्याचे प्रमुख कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये साखरेचे भाव फार कमी आहेत. ते सध्या प्रतिटनास 400 डॉलरच्या दरम्यान आलेले आहेत. त्यापेक्षा आपल्याकडील स्थानिक बाजारातील साखरेचे दर बरे आहेत. त्यामुळे कोणताही कारखाना साखर निर्यात करायला सध्या धजावत नाही आणि आर्थिकदृष्ट्या ते परवडणारेही नाही. साहजिकच सध्यातरी साखर निर्यात करण्यासारखी जागतिक बाजारातील स्थिती नाही.
एप्रिल महिन्यापासून बाझील देशाचा नवीन साखर हंगाम सुरू होईल. त्यामुळे यावर्षी एकूणच साखर निर्यातीला फारसे पोषक वातावरण राहणार नाही. केंद्र सरकारने वाढीव साखर निर्यात कोटा देण्याऐवजी इंधनांमध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण वाढविण्याची गरज आहे. ज्यामध्ये ते किमान 27 टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा निर्णय तातडीने घेतला गेला पाहिजे. साखर कारखान्याने डिस्टिलरीच्या क्षमता मोठ्या प्रमाणात वाढविलेल्या आहेत. अशा क्षमतावाढ केलेल्या कारखान्यांना पूर्णक्षमतेने डिस्टिलरी चालविता येईल एवढ्या इथेनॉलनिर्मितीची संधी दिली पाहिजे, अशी महत्त्वपूर्ण मागणीही ठोंबरे यांनी केली आहे.
इथेनॉलचे दरही प्रतिलिटरला किमान पाच रुपयांनी वाढविले पाहिजेत. जे साखर उद्योगाच्या फायद्याचे आहे. म्हणजेच, इथेनॉलचे दर वाढविणे, हा अत्यंत व्यवहारी व साखर उद्योगाच्या फायद्याचा निर्णय आहे. जो निर्णय ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्याही हिताचा होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
जागतिक बाजारातील दर क्विंटलला 3625 रुपयांदरम्यान
जागतिक बाजारात साखरेचा प्रतिटनाचा दर चारशे डॉलर आहे. सध्या एका डॉलरचा दर भारतीय रुपयांत 90.56 रुपये आहे. म्हणजेच प्रति क्विंटलला साखरेचा दर 3625 रुपयांदरम्यान जातो. भारतीय बाजारात सध्या साखरेच्या निविदाच क्विंटलला 3700 ते 3725 रुपयांपर्यंत जात आहेत. तर घाऊक बाजारातील एस् 30 ग््रेाड साखरेचा दर क्विंटलला 4000 ते 4025 रुपयांवर आहे. त्यामुळे निर्यात कोटा वाढविला तरी या कमी दरात देशातून साखर निर्यात परवडणारी नसल्याचेही घाऊक बाजारपेठेतून सांगण्यात आले.