

soldier train ticket confirmation
पुणे : सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीत आपल्या जीवाची पर्वा न करता भारतमातेचे रक्षण करणार्या वीर जवानांना रेल्वे प्रवासात गैरसोयीचा सामना करावा लागू नये, यासाठी रेल्वे प्रशासनाने लष्करी जवानांची तात्काळ कन्फर्म करून द्यावीत, अशी महत्त्वपूर्ण मागणी मध्य रेल्वे सल्लागार समिती सदस्य आनंद सप्तर्षी यांनी केली आहे.
सप्तर्षी यांनी यासंदर्भातील निवेदन रेल्वे मंत्रालयाला दिले आहे. त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, सध्या युद्धजन्य स्थितीमुळे सुट्टीवर असलेल्या लष्करी जवानांना पुन्हा ड्युटीवर हजर राहण्याचे आदेश मिळाले आहेत. अशा परिस्थितीत, जर त्यांच्याकडे कन्फर्म तिकीट नसेल, तर त्यांना प्रवास करताना अडचणी येऊ शकते, त्यामुळे जवानांची तिकीट तात्काळ कन्फर्म करून देण्यात यावे. अनेकदा त्यांना जनरल किंवा वेटिंग लिस्टवर प्रवास करावा लागतो, त्यामुळे त्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो.
या पार्श्वभूमीवर, सप्तर्षी यांनी रेल्वे मंत्रालयाकडे मागणी केली आहे. त्यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि पुणे रेल्वे अधिकार्यांना ई-मेलद्वारे ही मागणी केली आहे. या मागणीमुळे वीर जवानांना रेल्वे प्रवासात दिलासा मिळेल आणि ते अधिक निश्चिंतपणे आपल्या कर्तव्यावर लक्ष केंद्रित करू शकतील, अशी अपेक्षा सप्तर्षी यांनी व्यक्त केली आहे.
याबाबत पुणे विभागीय रेल्वे अधिकार्यांनी ई-मेलला उत्तर देत, सप्तर्षी यांना असे सांगितले की, यासंदर्भात योग्य ती पाऊले उचलण्यात येत असून, आर्मी कोट्याअंतर्गत त्यांची तिकीटे तात्काळ कन्फर्म करून दिली जात आहेत.