पुणे : पुढारी वृत्तसेवा : तब्बल 9 वर्षे स्कूल बसची फिटनेस तपसणी न करता आणि आरटीओ अधिकार्यांसह वाहतूक पोलिसांना गुंगारा देऊन विद्यार्थी वाहतूक करणारा स्कूल बसचालक अखेर सोमवारी आरटीओच्या हाती लागला. त्याच्याकडून फिटनेस तपासणीसह विविध नियमभंगप्रकरणी 39 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. आरटीओच्या वर्तुळात धडाकेबाज कामगिरीसाठी ओळख असलेल्या महिला अधिकारी रहिमा मुल्ला या महिला आरटीओ अधिकार्यांनी ही कारवाई केली.
वायुवेग पथकाच्या प्रमुख असलेल्या मुल्ला या सोमवारी तपासणी कामासाठी अपघातासाठी प्रसिद्ध असलेल्या नवले ब्रिज येथे आल्या. त्या वेळी त्यांच्यासमोरून एक स्कूल बस (टेम्पो ट्रॅव्हलर) गेली. त्या वेळी त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या मशिनमध्ये (टॅब) या गाडीचा क्रमांक टाकून पाहिला असता, या स्कूल बसचालकाने 2015 पासून म्हणजे तब्बल 9 वर्षांपासून वाहनाची फिटनेस तपासणी केलीच नसल्याचे समजले. तसेच, संबंधित चालकाने टॅक्स भरला नसल्याचेदेखील या वेळी निदर्शनास आले. त्यामुळे या बसचालकाकडून तब्बल 39 हजारांचा दंड वसूल करण्यात आला.
आरटीओ वायुवेग पथकातील मोटार वाहन निरीक्षक रहिमा मुल्ला यांनी एमएच 10 के 9372 या क्रमांकाची स्कूल बस नवले बि—ज खालून धावताना पाहिली. त्यातून शाळेतून घरी जाणारे विद्यार्थी प्रवास करत होते. तब्बल 9 वर्षे फिटनेस तपासणी केली नसलेल्या शालेय वाहनातून विद्यार्थ्यांचा प्रवास होत असल्याचे समजताच, त्यांनी बसची सर्व कुंडली बाहेर काढली. धडक कारवाई करत 39 हजारांचा दंड वसूल केला.
या स्कूल बसचालकाने 2015 पासून फिटनेस तपासणी केली नव्हती, तसेच 2017 पासून टॅक्स भरलेला नव्हता. विद्यार्थी सुरक्षा लक्षात घेऊन तत्काळ सबंधित स्कूल बसवर कारवाई करण्यात आली.
– संजीव भोर, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे
हेही वाचा