

पुणे: बेशिस्त वाहनचालकांवर आता आर्टिफिशिअल इंटेलिजन्स कॅमेरा आधारित रडार बेस्ड यंत्रणा लक्ष ठेवणार आहे. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या ताफ्यात अशा यंत्रणेने सज्ज असलेल्या अत्याधुनिक गाड्या दाखल झाल्या आहेत. या गाड्यांच्या छतावर ही यंत्रणा असणार असून, त्यामुळे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर स्वयंचलित आणि वेगवान कारवाई करणे शक्य होणार आहे. या नवीन तंत्रज्ञानामुळे एका तासात तब्बल १ हजार केसेस करण्याची क्षमता आरटीओला मिळाली आहे.
या चारही गाड्यांमध्ये एमटीईएस (मोबाईल ट्रेकिंग एन्फोर्समेंट सिस्टिम) यंत्रणा बसविण्यात आली आहे. ही यंत्रणा ३६० डिग्री फिरून रस्त्यावरील प्रत्येक बेशिस्त वाहनावर नजर ठेवणार आहे. यात केवळ रडारच नाही, तर इन्फ्रारेड लाइट्सचाही वापर करण्यात आला आहे. यामुळे रात्रीच्या काळोख्या अंधारात किंवा दाट धुक्यातही नियम तोडणाऱ्या चालकांना पकडणे सोपे झाले आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे बेशिस्त वाहनचालकांवर वचक बसविण्यासाठी मोठी मदत होणार आहे.
विशेषतः शहरात, महामार्गावर आणि ग्रामीण भागातील अशा ठिकाणी, जिथे वाहतुकीच्या नियमांचे सर्वाधिक उल्लंघन होते, तिथे ही वाहने उभी केली जातील. त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. ही वाहने आता शहराच्या विविध भागांमध्ये गस्त घालणार आहेत. त्यामुळे सीट बेल्ट न लावणे, हेल्मेट न घालणे, वेगमर्यादा ओलांडणे, ट्रिपल सीट किंवा चुकीच्या दिशेने वाहन चालविणे, यांसारख्या चुका करणाऱ्यांवर आता थेट चलन कारवाई होणार आहे.
अशी होणार बेशिस्तांवर कारवाई नवीन अद्ययावत प्रणाली असलेल्या या गाडीमध्ये एक चालक आणि एक आरटीओ वायुवेग पथकातील निरीक्षक असणार आहे. गाडी रस्त्यालगत एका सुरक्षित ठिकाणी पार्क केल्यानंतर आतमधील सिस्टिम प्रणालीवरील संगणकावर निरीक्षकाला आपला युजरनेम पासवर्ड टाकून लॉगिन करावे लागणार आहे. त्यानंतरच ही प्रणाली अॅक्टिव्ह होणार आहे. प्रणाली अॅक्टिव्ह झाल्यावर वाहनाच्या छतावरील ९ मेगापिक्सल असलेला एआय कॅमेरा रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांचे नियमभंग शोधून ते सिस्टिमवर आणेल. त्यांची तपासणी मोटार वाहन निरीक्षकाकडून केली जाईल अन् मग त्यानंतर सदरील वाहनावर चलन कारवाई होईल. तसेच, निरीक्षकाने केलेल्या कारवाईची पुणे मुख्यालयात तपासणी होणार आहे. मग अंतिम चलन होणार आहे.
आमच्याकडील वायुवेग पथकासाठी नुकत्याच चार व्हेईकल टॉप माउंटेड रडारबेस्ड सिस्टिम आणि पूर्णतः एआय बेस्ड कॅमेरे असलेल्या चार नव्या गाड्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. या गाड्यांमुळे नागरिकांना नियमांचे पालन करण्याची शिस्त लागणार आहे. या यंत्रणेची तासाला सुमारे एक हजार केसेस करण्याची क्षमता असणार आहे. फक्त कारवाई हा या यंत्रणेचा उद्देश नसून, वाहनचालकांना शिस्त लावणे आणि नियमभंग केल्यामुळे वाढत असलेले अपघात कमी करणे, हा या मागचा उद्देश आहे.
स्वप्निल भोसले, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे