

पुणे: पालक रागावल्यामुळे आणि अभ्यासात मन लागत नसल्यामुळे घरातून पळून मुंबईकडे जात असलेल्या तीन मुलांना आरपीएफच्या पुणे पथकाने शोधले. पुण्याहून रेल्वे पास होत मुंबईकडे जाणार्या हुसेनसागर एक्स्प्रेसमध्ये ही तीन मुले सापडली. त्या मुलांना आरपीएफच्या जवानांनी पालकांकडे केले स्वाधीन केले.
‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत दक्षिण भारतातून घर सोडून पळालेल्या तीन मुलांचा शोध रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) पुणे पथकाने घेतला. आंध्र प्रदेशातील पेड्डापुरम येथून ही मुले पळून आली होती. दि. 21 ऑगस्ट 2025 ला पेड्डापुरम येथील पोलिस ठाण्यात मुले हरवल्याची तक्रार दाखल झाली होती. शाळेसाठी घराबाहेर पडलेली ही मुले परत न आल्याने पालकांनी पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली होती. प्राथमिक तपासणीत ही मुले रेल्वेने मुंबईकडे जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. (Latest Pune News)
विशेष पथकाची नेमणूक
या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन आणि मुलांना मानवी तस्करीच्या धोक्यातून वाचवण्यासाठी आरपीएफ पुणे पथकाने तत्काळ कारवाई सुरू केली. वरिष्ठांच्या सूचनेनुसार, एक विशेष पथक तयार करण्यात आले आणि पुणे स्टेशनवर दक्षिण भारतातून येणार्या सर्व गाड्यांची कसून तपासणी सुरू झाली. पथकाला ट्रेन क्रमांक 12702 हुसेन सागर एक्स्प्रेसमध्ये तीन मुले आढळून आली. त्यांचा चेहरा आणि दिसणे हरवलेल्या मुलांच्या फोटोशी जुळत होते. पोलिसांनी मुलांशी संवाद साधून त्यांना विश्वासात घेतले. तेव्हा मुलांनी सांगितले की, अभ्यासावरून पालकांनी रागावल्यामुळे त्यांनी घर सोडले आणि मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला.
आरपीएफने दाखवली तत्परता
ही मुले सापडल्याची माहिती तातडीने पेड्डापुरम पोलिसांना देण्यात आली. मुलांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले. समितीच्या आदेशानुसार, मुलांना सध्या साथी संस्था शेल्टर होम, पुणे येथे ठेवण्यात आले आहे. मुलांच्या पालकांनी आणि पेड्डापुरम पोलिसांनी आरपीएफ पुणेचे आभार मानले आहेत.