

नारायणगाव: जुन्नर तालुक्यातील भोरवाडी गावच्या हद्दीत भुजबळ वस्तीतील मेंढपाळाच्या वाड्यावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात बाप-लेक गंभीर जखमी झाले. साळूराम धुळा करगळ (वय 45) व संतोष साळूराम करगळ (वय 16) अशी त्यांची नावे आहेत.
त्यांच्यावर नारायणगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, बाप-लेकावर हल्ला करणार्या बिबट्याचा मेंढपाळाच्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचे समजते. (Latest Pune News)
याबाबत वन विभागाचे वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण यांनी सांगितले की, शनिवारी (दि. 23) मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास मेंढपाळ साळूराम धुळा करगळ यांच्या वाड्यावर दोन बिबटे आले. एकाने मेंढपाळाच्या वाड्यात घुसून मेंढरू पळविले.
दुसरा बिबट्या तिथेच थांबला. बिबट्या मेंढपाळाच्या वाड्यात घुसल्याने कुत्री मोठमोठ्याने भुंकू लागली. त्याच्या आवाजाने मेंढपाळ साळूराम करगळ व त्यांचा मुलगा संतोष जागे झाले. बिबट्याने साळूराम करगळ यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या पायाला व हाताला त्याने चावा घेतला.
दरम्यान, वडिलांच्या मदतीला मुलगा संतोष धावला असता त्याच्यावर सुद्धा बिबट्याने हल्ला केला. त्यात तो गंभीर जखमी झाला. धनगर बांधवांचा आरडाओरडा ऐकून बाजूचे लोक गोळा झाले. त्यांनी तातडीने बाप-लेकाला नारायणगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दोघांचीही प्रकृती गंभीर असली तरी धोका टाळल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी सांगितले.
दरम्यान, मेंढपाळाच्या वाड्यात अडकलेल्या बिबट्यावर मेंढपाळांच्या कुत्र्यांनी हल्ला चढवला. त्यात बिबट्या ठार झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
केवळ नशीब बलवत्तर व आमची कुत्री शिकारी असल्यामुळे आम्ही वाचलो. जर शिकारी कुत्री नसते तर बिबट्याच्या हल्ल्यामध्ये आमच्या दोघांचाही मृत्यू झाला असता. बिबट्याने माझ्यावर हल्ला करून मला ओढत चालवले होते. परंतु, आमच्या कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केल्याने मी आणि माझा मुलगा वाचलो.
- साळूराम करगळ