

पुणे: महापारेषणच्या 400 केव्ही जेजुरी टॉवर लाइनमध्ये बुधवारी झालेल्या बिघाडामुळे शहरातील सर्वच भागांतील वीजपुरवठा खंडित झाला होता. या खंडित वीजपुरवठ्याचा फटका गुरुवारी देखील शहरातील काही भागांना बसला. अगोदरच उन्हाचा कहर, त्यातच खंडित वीजपुरवठ्यामुळे नागरिक महावितरणच्या गैरकारभारावर चांगलेच वैतागले आहेत.
महावितरणच्या अजब कारभाराचा फटका पुणेकर नागरिकांना चांगलाच बसत आहे. मागील काही दिवसांपासून वीजपुरवठा खंडित होण्याच्या छोट्या घडत होत्या. मात्र, बुधवारी अचानक जेजुरी टॉवरमध्ये बिघाड झाल्यामुळे शहरातील अति उच्च दाब व उच्च दाबाच्या उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद पडला.
परिणामी, कोथरूडसह हडपसर, सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, वडगाव धायरी, सिंहगड रस्ता, नर्हे, येवलेवाडी, एनआयबीएम रस्ता, पर्वती, पेशवे पार्क, मंडई, फुरसुंगी आदी भागांतील सुमारे चार लाख 57 हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा देखील खंडित झाला. या भागातील वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आला.
मात्र, बहुतांश भागांत गुरुवारी दिवसभर सुरळीत झाला नव्हता. काही भागांत तर वीज येणे-जाणे या घटना वारंवार घडत होत्या. अगोदरच उन्हाच्या तडाख्यामुळे नागरिक उकाड्यामुळे हैराण झाले आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांपासून उष्णतेची प्रचंड लाट आली आहे. पर्यायाने विजेच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे महापारेषणच्या काही अति उच्च दाबाचे उपकेंद्र व वीज वाहिन्यांवर ताण येत आहे.
त्यामुळे महापारेषणच्या जेजुरी 400 केव्ही जेजुरी टॉवर लाइनमध्ये बिघाड झाला तसेच पारेषण वाहिन्यांमध्ये विजेची मोठी तूट निर्माण झाली. त्यामुळे पारेषण यंत्रणेतील संभाव्य धोके व बिघाड टाळण्यासाठी स्वयंचलित भार व्यवस्थापन यंत्रणा म्हणजेच ’एलटीएस’ यंत्रणा कार्यान्वित झाली. परिणामी फुरसुंगी, कोथरूड, नांदेड सिटी, पर्वती येथील महापारेषणचे अति उच्च दाबाच्या उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद पडला.
त्यामुळे कोथरूड, हडपसर, सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, वडगाव धायरी, सिंहगड रस्ता, नर्हे, येवलेवाडी, एनआयबीएम रस्ता, पर्वती, पेशवे पार्क, मंडई, फुरसुंगी परिसरातील सुमारे 4 लाख 57 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बंद पडला. दरम्यान, गुरुवारी देखील शहरातील बहुतांश भागांतील वीजपुरवठा खंडित होता होता.