

Pahalgam Terror Attack Victim Pune
पुणे: ‘शाहरुख तूही मुस्लिम आहेस आणि ते हल्लेखोरही मुस्लिमच होते; पण तुमच्यात आणि त्यांच्यात एवढा फरक कसा रे?’ असा सवाल अतिरेकी हल्ल्यात मरण पावलेल्या कौस्तुभ गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांनी मुलगा कुणाल याच्या मुस्लिम मित्राला विचारला. तो गुरुवारी कौस्तुभ यांच्या अंत्यदर्शनाला आला होता. त्याला पाहताच संगीता यांनी टाहो फोडला. त्यांच्या या प्रश्नाने तिथे उपस्थित प्रत्येकाचे डोळे पाणावले.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेले कोंढव्यातील उद्योजक कौस्तुभ गनबोटे यांचे पार्थिव गुरुवारी त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. गनबोटे यांच्या अचानक जाण्याने परिसरात शोककळा पसरली.
मित्र, नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांनी त्यांच्या अंतिम दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. या शोकाकुल वातावरणात एका हृदयद्रावक क्षणाने मन हेलावून गेले. कौस्तुभ गनबोटे यांचा मुलगा कुणाल याचा मित्र शाहरुख इनामदार हा देखील आपल्या मित्राच्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आला होता. शाहरुखला पाहताच अतीव
दुःखाने हतबल कौस्तुभ यांच्या पत्नी संगीता स्वतःला आवरू शकल्या नाहीत. त्यांच्या या वेदनेत एका सामान्य माणसाच्या मनात दहशतवादाबद्दल असलेला आक्रोश आणि निरपराध लोकांच्या मृत्यूमुळे निर्माण झालेली निराशा स्पष्टपणे जाणवत होती. एका बाजूला माणुसकी जपणारा शाहरुख होता, जो आपल्या मित्राच्या दुःखात सहभागी होण्यासाठी आला होता, तर दुसरीकडे क्रूर दहशतवादी होते, ज्यांनी निष्पाप लोकांचे प्राण घेतले.
संगीता यांनी विचारलेला हा प्रश्न केवळ एक वैयक्तिक आक्रोश नव्हता, तर तो आजच्या समाजातील एका मोठ्या विसंगतीवर प्रकाश टाकणारा होता. शाहरुखने मित्र कुणाल आणि त्याची आई संगीता यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या डोळ्यांतून ओघळणारे अश्रू खूप काही सांगून गेले.
गोळ्या मारणारे तुमच्यासारखे नाहीत रे..!
या वेळी संगीता म्हणाल्या, तुझ्यात आणि त्यांच्यात एवढा का फरक रे? आमचा ड्रायव्हरही मुस्लिम होता, त्यानेही खूप मदत केली. घोडेवालेही मुस्लिम होते. ते खाली गेलेले होते. गोळ्यांचा आवाज ऐकून जिवाची पर्वा न करता आम्हाला मदत करण्यासाठी धावत परत आले आणि आम्हाला मदत करण्यासाठी जिवाच्या आकांताने पळू लागले. गोळ्या मारणारे तुमच्यासारखे नाहीत रे! असे त्या शाहरुखला म्हणाल्या.
शाहरुख म्हणाला, ही घटना अत्यंत वाईट
कुणाल हा माझा इंजिनिअरिंगचा मित्र आहे. मी बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील आहे. मात्र, कॉलेजसाठी पुण्यात आल्यापासून कुणालच्या घरच्यांनी मला मोठा आधार दिला. या कुटुंबाने मला जीव लावला. मात्र, त्यांच्यासोबत झालेली ही घटना अत्यंत वाईट आहे. कधीही न भरून निघणार नुकसान यातून झाले आहे. अशा भावना दु:खी अंत:करणाने शाहरुखने व्यक्त केल्या.
काश्मीरला जाण्याआधी घरावर लावला नवीन बोर्ड
काश्मीरला जाण्याआधी फरसाण हाऊसच्या नावाचा कौस्तुभ यांनी नवीन बोर्ड लावला होता. त्यावर बोर्ड छान असल्याची आमची चर्चाही झाली. आम्ही त्यांनी केलेले कष्ट पाहिले आहे. मागील 15 वर्षांत त्यांनी कष्टाच्या जोरावर नाव करत फरसाणचा एक ब्रँड तयार केला आहे. काळाने हा खूप मोठा घात केला, असे कौस्तुभ यांचे शेजारी उदयसिंह मुळीक यांनी सांगितले.