

पुणे: गुन्हे शाखेने खराडी येथील ‘स्टेबर्ड अझुर सूट्स’ या हॉटेलमध्ये केलेल्या कारवाईत सिगारेटच्या पॉकेटमध्ये कोकेनसदृश्य अमली पदार्थाच्या तीन पुड्या आढळून आल्या आहेत. तर, गांजा ईशा सिंग नावाच्या तरुणीच्या लाल रंगाच्या पर्समध्ये मिळून आला. हे कोकेनसदृश्य ड्रग नेमके कोणी आणले, याचा तपास सुरू आहे.
दरम्यान, ससून रुग्णालयाच्या प्राथमिक अहवालात प्रांजल खेवलकर आणि श्रीपाद यादव यांनी मद्य घेतल्याचे आढळले आहे. आरोपींच्या रक्ताचे नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले असून, त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर ड्रगचे सेवन कोणी केले हे स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. (Latest Pune News)
याप्रकरणी माजी मंत्री एकनाथ खडसेंचे जावई, रोहणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांच्यासह निखिल जेठानंद पोपटाणी, समीर फकीर महम्मद सय्यद, सचिन सोनाजी भोंबे, श्रीपाद मोहन यादव, ईशा देवज्योत सिंग, प्राची गोपाल शर्मा या सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध अमली पदार्थविरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक
सुदर्शन गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार खराडी पोलिस ठाण्यात अमली पदार्थविरोधी (एनडीपीएस) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी पहाटे पावणेचार वाजता गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. त्यावेळी हॉटेलच्या खोली क्रमांक 102 मध्ये ही पार्टी सुरू होती.
दरम्यान, या पार्टीत ड्रग्ज नेमके कोणी आणले, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. पोलिसांनी सातही आरोपींकडे चौकशी केली असता, सर्वांनी हात वर केले आहेत. शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे तीन दिवस स्टेबर्ड हॉटेलमध्ये खेवलकरच्या नावाने फ्लॅट बूक करण्यात आला होता. शुक्रवारीदेखील येथे पार्टी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याचादेखील तपास पोलिस करत आहेत. आदल्या दिवशीही खोलीमध्ये काही व्यक्ती येऊन गेल्याचे निदर्शनास आले आहे.
खेवलकर हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती आहेत. खेवलकर यांना पुणे शहरातील खराडी परिसरातील एका सोसायटीमध्ये ड्रग्ज पार्टी केल्याच्या आरोपप्रकरणी गुन्हे शाखेकडून करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान अटक करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये प्रांजल खेवलकर यांच्यासह पाच पुरुष आणि दोन महिलांना ताब्यात घेतले आहे.
प्राथमिक अहवालात दोघांनी मद्यप्राशन केल्याचे समोर
गुन्हे शाखेने रविवारी (दि.27) सकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी सात जणांना वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात आणले होते. त्यांनी मद्य आणि अमली पदार्थांचे सेवन केले आहे का? हे तपासण्यासाठी सर्वांचे रक्त आणि लघवीचे नमुने घेण्यात आले. ससूनच्या प्राथमिक अहवालात खेवलकर आणि श्रीपाद यादव यांनी मद्य घेतल्याचे आढळले आहे.
ससूनमधील मुख्य वैद्यकीय अधिकार्यांनी सर्व आरोपींचे रक्त आणि लघवीचे नमुने सीलबंद करून पोलिसांच्या हवाली केले आहेत. हे नमुने अमली पदार्थांच्या तपासणीसाठी आता न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल दोन ते तीन दिवसांत येण्याची शक्यता आहे.