पुणे : राजगुरूनगर स्थानकातील एस. टी. कर्मचारी संपावर; प्रवाशांचे हाल

पुणे : राजगुरूनगर स्थानकातील एस. टी. कर्मचारी संपावर; प्रवाशांचे हाल
Published on
Updated on

एस.टी. महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी राजगुरूनगर (ता.खेड जि.पुणे) एस.टी. बस आगारातील कर्मचाऱ्यांनी शनिवारी (दि. ६) पहाटेपासून संप सुरू केला. एसटीचे ३८५ कर्मचाऱ्यांनी स्थानकासमोरच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर बेमुदत आंदोलन सुरू केले. एस. टी. कर्मचारी संपावर असल्‍याने राजगुरुनगर बसस्थानकावरून एकही एसटी बाहेर पडली नाही.

आगारातील एकुण ९० बसेस थांबून राहिल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसाेय झाली. पूर्वकल्पना नसल्याने एसटी बससाठी स्थानकात आलेल्या प्रवाशांचे हाल झाले. अनेकांना पर्याय नसल्याने खासगी महागड्या प्रवासी वाहतूकीचा आधार घेऊन निश्चित स्थळी जावे लागले. यात महिला, मुलांचे प्रचंड हाल झाले.

निवडणूक कामासाठी, कोरोना सारख्या आजारात एसटी बस आणि कर्मचारी सरकार हक्काने वापर करून घेते. मात्र सुविधा, सवलती देताना महामंडळ खासगी असल्याचे सांगितले जाते. हा अन्याय कधी संपणार, असा प्रश्न आंदोलकांनी केला आहे. खासगीकरण झाल्याने अनेक बाबतीत ठेकेदार नेमून व्यवस्थापनाने भरमसाठ खर्च करून एसटीची आर्थिक स्थिती अडचणीत आणली आहे.

कर्मचाऱ्यांचा कोणत्याही प्रकारचा दोष नाही. असे असताना पगार वेळेत होत नाहीत. कर्मचारी आर्थिक विवंचनेत सापडला असून, अनेक ठिकाणी आत्महत्या होऊ लागल्या आहेत. शासनाने वेळीच निर्णय घ्यावा यासाठी राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे पाऊल उचलले आहे.

राजगुरूनगर आगारातील कर्मचारी संघटना विरहित आंदोलनात सहभागी झाले आहेत असे यावेळी सांगण्यात आले.भाजपचे जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन कामगारांच्या मागण्या जाणून घेतल्या. आंदोलनाला खेड तालुका भाजपचा पूर्ण पाठिंबा व्यक्त केला.

एसटी ही ग्रामीण भागाच्या प्रवासी वाहतुकीचा कणा आहे. दिवाळीच्या सणासाठी अनेक लोक शहरात किंवा शहरातील लोक गावाकडे आले आहेत. अनेकजण प्रवासात आहेत. संपामुळे या प्रवाशांचे हाल झाले आहेत. शासकीय अनास्थेमुळे सर्वसामान्य माणसाला त्रास होत आहे. आर्थिक स्थिती चांगली नसताना महागड्या प्रवासाचा सामना करावा लागत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला भारतीय जनता पक्षाच्या वतीने जाहीर पाठिंबा आहे.
-अतुल देशमुख, जिल्हा परिषद सदस्य, पुणे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news