

Pune Rain News Bhide Bridge Ekta Nagar Society Update
पुणे : खडकवासला धरणातून सोडलेले पाणी पुण्यातील एकता नगरमधील शिवपुष्प चौकातील सोसायटीत शिरले आहे. पाणी काढण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
मंगळवारी पुणे आणि घाटमाथ्यावर दमदार पावसाने झोडपलेय. शहरात संततधार असली तरी घाटमाथ्यावर पावसाने जोरदार पाऊस पडत असल्याने खडकवासलामधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 29084 क्युसेक वाढवून सायंकाळी 7.00 वा.35310 क्यूसेक करण्यात आला आहे. खडकवासला विसर्ग सायंकाळी सातनंतर वाढणार असल्याने अतिरिक्त पाणी याभागात शिरणार असा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे येथील नागरिकांच्या मदतीसाठी लष्कराच्या (आर्मी) तुकड्यांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले होते. सात वाजता पाणी सोडल्यावर आठ ते साडेआठ वाजेपर्यंत पाणी एकता नगरीपर्यंत येईल, असे महापालिका सहाय्यक आयुक्त यांनी सांगितले होते.
पुणे महापालिका सहाय्यक आयुक्त प्रज्ञा पोतदार-पवार म्हणाल्या, आमच्याकडून एकता नगर मधील नागरिकांच्या सोयीसाठी सर्व यंत्रणा तैनात करण्यात आली आहे, विद्युत विभाग अग्निशमन दल आरोग्य विभागाकडून सर्व सुविधा अत्यावश्यक परिस्थिती करिता सज्ज ठेवण्यात आली आहे याशिवाय परिसरात अनाउन्समेंट करण्यात आले आहे, तसेच अत्यावश्यक परिस्थिती रात्रीच्या वेळी उद्भवल्यास ठिकठिकाणी जनरेटरवर होलीजन लावण्यात आले आहेत, याशिवाय स्थानिक नागरिकांच्या राहण्याची व्यवस्था जवळच असलेल्या बॅडमिंटन हॉल आणि एका शाळेत करण्यात आले आहे. रात्री सात वाजता पाणी सोडण्यात येणार आहे त्यामुळे रात्रभर आमच्याकडे यंत्रणा या भागात तैनात असणार आहे.
संध्याकाळी आठच्या सुमारास एकता नगरी द्वारका सोसायटीमध्ये पाणी फिरायला सुरुवात झाली असून फायर ब्रिगेडच्या दोन गाड्या जेसीबी सज्ज आहे.
भिडे पूल पाण्याखाली
मुसळधार पाऊस आणि विसर्गामुळे पुण्यातील भिडे पूल संध्याकाळी चारच्या सुमारास पाण्याखाली गेला. नदीपात्रातील आजूबाजूच्या नागरिकांना महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला असून नदीपात्रात जाणारी दोन्ही मार्ग वाहतुकीसाठी प्रशासनाकडून बंद करण्यात आली आहे.
पुणेकरांनो सतर्क रहा
धरणक्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला साखळी प्रकल्पातून मुठा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे, ही बाब लक्षात घेऊन जलसंपदा विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
जलसंपदा विभागाच्या खडकवासला पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुसळधार पावसामुळे धरणांच्या क्षेत्रात पाण्याचा येवा येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे धरणामधून मुठा नदीपात्रात विसर्ग सोडण्यात आलेला आहे. हा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीपात्रात नागरिकांनी उतरू नये. नदीपात्रात तत्सम काही साहित्य, वाहने किंवा जनावरे असल्यास ती तत्काळ हलविण्यात यावीत, असे आवाहन केले आहे.