पुणे: पुणे शहराच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आवश्यक असलेल्या बसेस मार्च 2026 पर्यंत पीएमपीच्या ताफ्यात येणार आहेत. शहरासाठी 3500 बसेसची गरज आहे. मार्च 2026 अखेर ताफ्यातील बसेसची संख्या 3200 हून अधिक होणार असल्याने शहरातील प्रवासी वाहतूक सेवा अधिक सक्षम होईल, असा विश्वास पीएमपीएमएलच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालिका दीपा मुधोळ-मुंडे यांनी गुरुवारी (दि.10) ‘पुढारी व्यासपीठ’वर बोलताना व्यक्त केला.
पीएमपीच्या ताफ्यात सध्या 2 हजार 27 बसेस असून, त्याद्वारे संपूर्ण शहर, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए भागात सेवा पुरवली जात आहे. या ताफ्यात भाडेतत्त्वावरील नव्या 400 बस दाखल होत असून, आणखी दोन्ही महापालिका, पीएमआरडीए यांच्या आर्थिक सहकार्यातून एक हजार बसेससाठी निविदा प्रक्रिया सुरू असून, नोव्हेंबर 2025 पासून या एक हजार बसेस ताफ्यात दाखल व्हायला सुरुवात होईल आणि मार्च 2026 पर्यंत बसेसची संख्या 3 हजार 400 पर्यंत पोहोचणार आहे. यापैकी 144 बस आयुर्मान संपल्यामुळे ताफ्यातून बाद केल्या जाणार आहेत, असे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. (Latest Pune News)
वेळेत मिळणार बसगाड्या, अन् खासगी वाहने होतील कमी
पुणे महापालिकेने केलेल्या सर्वंकष आराखड्यानुसार (सीएमपी-कॉम्प्रेन्सिव्ह मोबेलिटी प्लॅन) प्रत्येक एक लाख लोकसंख्येसाठी 55 बसगाड्या गरजेच्या आहेत, तरच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कार्यक्षम होऊ शकेल. पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका या कार्यक्षेत्रात असलेली सध्याची लोकसंख्या विचारात घेतल्यास 3,500 ते 3,600 एवढ्या बसगाड्या रस्त्यावर असणे आवश्यक आहे.
परंतु, प्रत्यक्षात केवळ 2027 बसगाड्या पीएमपीच्या ताफ्यात आहेत. त्यामुळे पुणेकरांना पुरेशी बससेवा मिळत नाही. पीएमपी अध्यक्ष मुधोळ-मुंडे यांनी सांगितलेल्या या नियोजनानुसार पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत नव्या बसगाड्यांची संख्या 3200 च्या घरात जाणार आहे. त्यामुळे पुणेकरांना वेळेवर बस मिळून रस्त्यावरील खासगी वाहनांची संख्या कमी होईल.
पीएमपीएमएल आणि मेट्रो हे स्पर्धक नसून, ते एकमेकांना पूरक आहेत. त्यामुळे मेट्रोची फीडर सेवा सक्षम करण्यावर आमचा भर आहे. मेट्रोही त्यासाठी सहकार्य करण्यास तयार आहे. त्यांच्या मदतीने फीडर सेवेचे नियोजन करण्यात येत आहे.
- दीपा मुधोळ-मुंडे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल