

पुणे: घरात झोपलेल्या स्वतःच्या अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करणार्या बापास सत्र न्यायाधीश के. डी. शिरभाते यांच्या न्यायालयाने पॉक्सो कायद्यानुसार पाच वर्षे सक्तमजुरी आणि 20 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम मुलीस देण्यात यावी. आरोपीने दंड भरला नाही तर त्याच दोन महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही निकालात नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी, अकरा वर्षीय मुलीच्या आईने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. 2016 ते चार मे 2021 दरम्यान हा प्रकार सुरू होता. मुलगी रात्री घरात झोपली असता पिता तिच्याशी अश्लील कृत्य करत असे. हा प्रकार कोणास सांगू नको, अशी धमकी त्याने मुलीला दिली होती. एक दिवस हा सर्व प्रकार मुलीने आईला सांगितला. (Latest Pune News)
त्यामुळे आईने पतीच्या विरोधात तक्रार दिली होती. या खटल्याचे कामकाज सरकारी वकील नितीन कोंघे यांनी पाहिले. गुन्हा सिद्ध करण्यासाठी त्यांनी तीन साक्षीदार तपासले. आरोपी हा मुलीचा जन्मदाता बाप आहे. पीडितेवर आरोपीने केलेला गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. त्यामुळे आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा द्यावी, अशी मागणी एड. कोंघे यांनी केली. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्य्यायालयाने शिक्षा सुनावली.