

पुणे : खाद्यपदार्थांचा गाडा बंद करण्यासाठी गेलेल्या प्रशिक्षणार्थी महिला पोलिस उपनिरीक्षकाच्या हाताचा महिलेने चावा घेतला. ही घटना 21 सप्टेंबरला रात्री पावणेबाराच्या सुमारास वानवडीतील संविधान चौकात असलेल्या काकडे मैदान खाऊ गल्लीत घडली. याप्रकरणी दोन महिलांविरुद्ध वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
भगवती मोहन सौंद (वय 24, रा. शांतीनगर, वानवडी) आणि सुमित्रा तुलीराम थापा (वय 19) अशी गुन्हा दाखल झालेल्या महिलांची नावे आहेत. याप्रकरणी महिला पोलिस उपनिरीक्षक सारिका शिर्के यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार संबंधित महिलांविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार सारिका शिर्के प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षक असून, वानवडी पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. 21 सप्टेंबरला रात्रपाळीला ड्युटीवर असताना सारिका शिर्के पथकासह संविधान चौकातील काकडे मैदान खाऊगल्लीत गेल्या होत्या. त्या वेळी त्या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत खाद्यपदार्थांची विक्री केली जात असल्याचे दिसून आले. त्यामुळे शिर्के यांनी संबंधितांना दुकाने बंद करण्यास सांगितले. खाद्यपदार्थ स्टॉलवर कारवाई करीत असताना आरोपी भगवती सौंद आणि सुमित्रा थापा यांनी शिर्के यांना शिवीगाळ केली. सुमित्राने उपनिरीक्षक शिर्के यांच्या डोक्याचे केस ओढून हातावर नखाने ओरबडले, तर आरोपी भगवतीने हाताचा चावा घेऊन शिर्के यांना जखमी केले. याप्रकरणी वानवडी पोलिस तपास करीत आहेत.