

Pranjal Khewalkar Pune Rave Party Case
पुणे : माझ्यावर केवळ राजकीय संबंधांमुळे कारवाई केली जात आहे. मला अडकवले जात आहे, माझ्याकडे कोणताही प्रतिबंधित पदार्थ नव्हता, असा ठाम दावा प्रांजल खेवलकर यांनी केला आहे. खराडीतील रेव्ह पार्टी प्रकरणात अटक केलेल्या खेवलकर यांच्या वतीने आज (दि.२७) न्यायालयात झालेल्या सुनावणीत खेवलकर यांच्या वकिलांनी बाजू मांडली.
रेव्ह पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या प्रांजल खेवलकर यांच्या वतीने आज न्यायालयात झालेल्या सुनावणीत, त्यांच्या वकिलांनी पोलिसांच्या कारवाईवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. खेवलकर यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही, त्यांच्याकडे कोणतीही अंमली पदार्थ किंवा अवैध वस्तू सापडलेली नाही. तरीही त्यांना अडकवले जात आहे, असा दावा खेवलकर यांच्या वकिलांनी केला.
माझ्या राजकीय ओळखीमुळेच मला लक्ष्य केले जात आहे. केवळ राजकीय कारणांमुळे माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माझ्याकडे कोणताही प्रतिबंधित पदार्थ आढळला नाही. तरीही मला अडकवले जात आहे. मी कुणालाही फोन केलेला नाही. माझ्यावर लादलेले आरोप निराधार आहेत. यापूर्वीही सिव्हिल ड्रेसमध्ये काही लोक माझ्यावर पाळत ठेवून मला अडकवण्याचा प्रयत्न करत होते, असा आरोप खेवलकर यांनी केला आहे.
प्रांजल खेवलकर यांना याआधीही तीन वेळा अडकवण्याचा प्रयत्न झाला आहे. यातील एकही कलम लागू होत नाही," असा आरोप वकिलांनी केला. पोलिसांनी घटनास्थळी येऊन व्हिडिओ शूटिंग केले. यावर कारवाई झाली पाहिजे. पोलिसांनी आधी पाहणी केली का? सीसीटीव्ही फुटेज आमच्याकडे आहे, त्यात खेवलकर यांचा कोणताही सहभाग दिसत नाही, असे वकिलांनी सांगितले.
या ठिकाणी काही अंमली पदार्थ आढळले, पण ते कुठे दुसरीकडे मिळाले. खेवलकर यांच्याकडे एकही गोष्ट सापडली नाही. ही कारवाई राजकीय द्वेषातून केली जात आहे. धूळफेक करण्यासाठी खोटा गुन्हा दाखल केला आहे, असा आरोप वकिलांनी केला.
या प्रकरणात पोलिसांनी पाच पुरुष आणि दोन महिलांना ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे. मात्र खेवलकर यांच्या वकिलांनी न्यायालयाकडे तातडीने जामिनासाठी अर्ज केला आहे. राजकीय हस्तक्षेपामुळेच ही कारवाई झाल्याचा पुनरुच्चार करत, खेवलकर यांना न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे.