

Pranjal Khewalkar police custody
पुणे : पुण्यातील उच्चभ्रू सोसायटीत शनिवारी मध्यरात्री पोलिसांनी टाकलेल्या धाडीत माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह सात जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, खेवलकर यांच्यासह सातही आरोपींना न्यायालयाने २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
संपूर्ण तपासासाठी आरोपींची पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले. पुढील तपासासाठी आरोपींना विश्वासात घेऊन चौकशी करणे गरजेचे आहे.
आरोपींनी स्टेबर्ड हॉस्पिटॅलिटीमध्ये २५ ते २८ जुलैदरम्यान तीन रूम बुक केल्या होत्या. या बुकिंगमागील उद्देश, आणि त्या काळात कोणकोण आले-गेले, याचा तपास करणे बाकी आहे.
हॉटेलच्या आवारात तीन अनोळखी व्यक्ती येऊन गेल्याची माहिती मिळाली असून, त्यांचा शोध घेणे आणि त्यांची चौकशी करणे आवश्यक आहे.
प्रांजल खेवलकर व श्रीपाद यादव हे रेकॉर्डवरील आरोपी असल्याने, त्यांचा मागील गुन्हेगारी इतिहास तपासणे गरजेचे आहे.
या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचा शोध घेणे बाकी आहे. त्यासाठी आरोपींच्या कस्टोडियल इंटरोगेशनची आवश्यकता आहे.
अटक आरोपींनी संगनमताने टोळी तयार करून अंमली पदार्थांचा अवैध व्यवसाय केला आहे का, याचा तपास करणे आवश्यक आहे.
अंमली पदार्थ कुठून आणले, कोणाकडून विकत घेतले, कोणाला विक्री करणार होते, साठा कुठे ठेवला होता, आणखी कोण साथीदार आहेत – या सर्व बाबींचा तपास करण्यासाठी आरोपींना विश्वासात घेणे गरजेचे आहे.
गैरव्यवहारातून मिळालेल्या पैशातून मालमत्ता जमा केली आहे का, याचा तपास करणे आवश्यक आहे.
आंतरराज्य तस्करी टोळीशी संबंध आहेत का, हे पडताळणे गरजेचे आहे.
या अवैध व्यवसायासाठी कोण पैसे पुरवतो, याचा शोध घेणे बाकी आहे.
तपासादरम्यान नवीन मुद्दे समोर आल्यास त्यावरही चौकशी करणे आवश्यक आहे.
सरकारी वकिलांनी सर्व आरोपींना पुढील तपासासाठी पोलीस कोठडी देण्याची मागणी केली, तर प्रांजल खेवलकर यांच्या वकिलांनी हे राजकीय षडयंत्र असल्याचा युक्तिवाद केला. पोलिसांनीच अमली पदार्थ प्लांट केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापले असून, विरोधी पक्षांकडून सरकारवर दबाव आणण्याचा आरोप केला जात आहे.
दरम्यान, जप्त केलेल्या अंमली पदार्थांचे नेटवर्क, आर्थिक व्यवहार, आरोपींचे पूर्वग्रह, आणि आंतरराज्य संबंध यांचा सखोल तपास अपेक्षित आहे. आरोपींच्या कस्टोडियल चौकशीशिवाय या गुन्ह्याचे सर्व पैलू उघड होणे कठीण असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणातील तपास सुरू असून, पुढील काही दिवसांत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पोलिसांनी ४१,३५,४०० रुपये किमतीचे कोकेन, गांजा, १० मोबाईल, दोन चारचाकी वाहने, हुक्कापॉट, दारूच्या बाटल्या आणि इतर साहित्य जप्त केले आहे. आरोपींकडून ७० ग्रॅम गांजा व २ ग्रॅम ७ मिलीग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले आहे. या अंमली पदार्थांचा स्रोत, विक्रीचे नेटवर्क, आणि आणखी कोणकोण सहभागी आहेत, याचा तपास करणे आवश्यक आहे.