pune porsche accident : दिवट्याचा मुक्काम की सुटका? निकालाकडे लक्ष

pune porsche accident : दिवट्याचा मुक्काम की सुटका? निकालाकडे लक्ष

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कल्याणीनगर ड्रंक अ‍ॅन्ड ड्राईव्ह प्रकरणात बालसुधारगृहात असलेला अल्पवयीन बिल्डरपुत्र, रक्ताचा नमुना बदलून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणात पोलिस कोठडीत असलेले आई व वडील अन् ससून सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी, अल्पवयीन मुलांना टेबलवर मद्य पुरविल्याप्रकरणी येरवडा कारागृहात असलेले पबचे मालक व कर्मचारी यांच्या पुढील मुक्कामाची दिशा उद्या (दि. 5) न्यायालयात ठरणार आहे.

पबमध्ये मद्यपान करून सुसाट महागडी मोटार चालवत दोघांच्या मृत्यूस जबाबदार ठरलेल्या अल्पवयीन बिल्डरपुत्राला 19 मे रोजी बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले. मुलावर दाखल असलेला गुन्हा जामीनपात्र असून, मुलगा अल्पवयीन असल्याचे त्याच्या वकिलांनी मंडळाच्या निदर्शनात आणून दिले. त्यामुळे मंडळाने त्वरित मुलाला जामीन मंजूर केला होता. मात्र, त्यात असलेल्या अटींमुळे या निकालावर देशभरातून प्रतिक्रिया उमटल्या. त्यामुळे मंडळाने आपल्या आदेशात दुरुस्ती करून मुलाची रवानगी बालसुधारगृहात करण्याची विनंती पोलिसांनी केली. त्यानुसार मुलाची येथील बाल न्याय मंडळाने बुधवारपर्यंत (दि. 5) बालसुधारगृहात रवानगी केली. सुधारगृहात ठेवण्याची मुदत संपत असल्याने त्याचा तेथील मुक्काम वाढवला जाणार की त्याची तेथून सुटका होणार, याचा निर्णय बुधवारी होणार आहे.

दाम्पत्याची पोलिस कोठडी वाढणार की कारागृहात रवानगी?

मुलाला गुन्ह्यातून वाचविण्यासाठी त्याच्या रक्ताचा नमुना बदलून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणात अगरवाल पती-पत्नी सध्या पोलिस कोठडीत आहेत. त्यांच्या कोठडीची मुदत बुधवारी (दि. 5) संपत आहे. त्यामुळे अगरवाल दाम्पत्यांना विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांची रवानगी येरवडा कारागृहात होणार की पोलिसांना दोघांची पोलिस कोठडी वाढवून मिळणार, हे बुधवारी स्पष्ट होणार आहे.

पबमालकासह कर्मचार्‍यांच्या जामीन अर्जांवर सुनावणी

अल्पवयीन मुलाला कार चालविण्यास देण्याबरोबरच अल्पवयीन मुलासह त्याच्या मित्रांना टेबलवर मद्य पुरविल्याप्रकरणी अटकेत असलेले बांधकाम व्यावसायिक, कोझी व ब्लॅक पबच्या मालकासह कर्मचार्‍यांनी जामिनासाठी अर्ज केला आहे. 29 मे रोजी दाखल झालेल्या अर्जावर 1 जून रोजी सुनावणी होणार होती. मात्र, ती 5 जून रोजी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे या गुन्ह्यात न्यायालयाने जामीन मंजूर केला, तर विशाल अगरवाल सोडून इतरांचा घरी जाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

ससूनमधील डॉक्टरांसह कर्मचार्‍यांकडेही लक्ष

बिल्डरपुत्राचा रक्ताचा नमुना बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी ससूनच्या न्याय वैद्यक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे आणि आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर याच्यासह शिपाई अतुल घटकांबळे यांच्या पोलिस कोठडीत पाच जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. कोठडी काळात या गुन्ह्यात पोलिसांना आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले, तर या तिघांच्या पोलिस कोठडीत वाढ होऊ शकते, अन्यथा त्यांना येरवडा कारागृहात पाठवले जाऊ शकते.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news