पुणे : पुढारी वृत्तसेवा : वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे डॉ. चंद्रकांत म्हस्के यांच्याकडे ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठातापद सोपवण्यात आले होते. आता प्रशासकीय कारणास्तव डॉ. म्हस्के यांच्याऐवजी मुंबईतील ग्रँट मेडिकल कॉलेजचे अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. एकनाथ पवार यांच्याकडे अधिष्ठातापदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. वैद्यकीय अधीक्षक पदानंतर आता ससूनच्या अधिष्ठातापदाची संगीतखुर्ची सुरु झाली आहे.
कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलल्याचा धक्कादायक प्रकार ससून रुग्णालयात घडला. त्यामुळे ससूनमधील डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर यांना अटक करून निलंबित करण्यात आले. ससूनचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांनी या प्रकरणामध्ये गांभीर्याने लक्ष न घातल्याचे विशेष समितीने अहवालात नमूद केले. त्यानंतर 29 मे रोजी वैद्यकीय शिक्षण विभागाने डॉ. काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवले. ससून रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांच्याकडे सोपवण्यात आला.
त्यानंतर 20 दिवसांमध्येच डॉ. चंद्रकांत म्हस्के यांच्याकडून अतिरिक्त कार्यभार काढून घेण्यात आला आहे. याबाबत गुरुवारी संध्याकाळी शासन निर्णय जारी करण्यात आला. प्रशासकीय कारणास्तव पुढील आदेश येईपर्यंत डॉ. एकनाथ पवार यांनी अतिरिक्त कार्यभार सांभाळावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. राज्यपालांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली असून, याबाबत वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन आयुक्तांनी वेगळे आदेश काढण्याची आवश्यकता नाही, असे पत्र उपसचिव शंकर जाधव यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आले आहे.
हेही वाचा