

पुणे : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी फ्रेशर्स पार्टी आयोजित करून गैरप्रकार केल्याचे आढळून आल्यास संबंधित पार्टी आयोजित करणार्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी, पब आणि हॉटेलचा परवाना रद्द करण्याचा इशारा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. तसेच अल्पवयीनांना मद्यविक्री केल्याचे आढळून आल्यास थेट गुन्हा दाखल करून असेही त्यांनी म्हटले आहे.
’शहरातील काही बार, पब शुल्क विभागाच्या नियमावलीचे उल्लंघन करून अल्पवयीनांना मद्याची विक्री केली जात आहे. नियमांचे उल्लंघन करणे तसेच हॉटेल, पबचालकांनी अल्पवयीनांना प्रवेश देण्यापूर्वी त्यांच्याकडील कागदपत्रांची पडताळणी करणे गरजेचे आहे. अल्पवयीनांकडे असलेल्या डीजी लॉकर सुविधेतील कागदपत्रे तपासावीत. अशा कार्यक्रमास महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी होत असल्यास त्यांना परावृत्त करावे. महाविद्यालयांना याबाबतची सूचना द्यावी. इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने असा कार्यक्रम आयोजित केल्यास त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे पोलिस आयुक्तांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
महाविद्यालयीन तरुण-तरुणींसाठी फ्रेशर्स पार्टी आयोजित केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात किकी पबवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निखिल प्रकाश सुर्वे (वय 42, रा. बोरिवली पूर्व, मुंबई), रोहन रमेश सावंत (वय 39, रा. खराडी), उपेंद्र संजय जुवेकर (वय 26, रा. सोमवार पेठ), सुदर्शन फटाके (वय 22, रा. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस अंमलदार अमित बधे यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही फ्रेशर्स पार्टी 23 ऑगस्ट रोजी आयोजित केली होती. आयोजकांनी इव्हेंटसंदर्भात कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता विनापरवाना फ्रेशर्स पार्टीचे आयोजन केले. पार्टीसाठी 100 ते 150 मुला-मुलींना आमंत्रित केले. हॉटेलमालकांना कोणत्याही पार्टीची पूर्वसूचना किंवा परवानगी पोलिसांनी प्राप्त केल्यानंतरच याबाबत पार्टीचे आयोजन करावे, अशी पूर्वसूचना दिली असतानासुद्धा पोलिसांना कोणतीही माहिती किंवा पूर्वसूचना न देता पार्टीचे आयोजन केले होते. नंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी उत्पादन शुल्कच्या मदतीने ही पार्टी उधळून लावली होती.