पुणे : पुढारी वृत्तसेवा : पद्मविभूषण व ऑस्कर पुरस्कारविजेते ज्येष्ठ संगीतकार ए. आर. रेहमान यांचा कार्यक्रम संपण्यास काही मिनिटे राहिली असतानाच किरकोळ कार्यक्रम बंद पाडावा तशा पध्दतीने पुणे पोलिसांनी नियमांकडे बोट दाखवत तो बंद पाडला. पुणे पोलिसांनी केलेल्या स्टंटबाजीने नाव कमावले का घालवले? असा प्रश्न केला जात असतानाच पुणे पोलिस टीकेचे धनी होत आहेत. दरम्यान, शहरात रात्री उशिरापर्यंत चालणारे पब, क्लब, हॉटेल कधी बंद पाडणार? असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे.
रविवारी ए. आर. रेहमान यांच्या पुण्यातील कार्यक्रमास पुणे, मुंबई येथील उच्चपदस्थ अधिकार्यांसह अनेक आमदार तसेच इतर लोकप्रतिनिधी या कार्यक्रमास उपस्थित होते. हा कार्यक्रम शेवटच्या टप्प्यात आला होता. रेहमान यांना दहा वाजल्याचे लक्षात आले नाही. त्या वेळी दहा वाजून काही मिनिटे झाली होती आणि शेवटचे गाणे बाकी होते. 'वंदे मातरम' या गाण्याने रंगलेल्या कार्यक्रमाचा शेवट होणार होता. मात्र, 'छय्या छय्या' गाण्यादरम्यान बंडगार्डन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पाटील हे स्टेजवर पोहचले आणि त्यांनी रेहमान यांना हातवारे करीत शो बंद पाडला. मात्र, रेहमान यांनीही त्यांनी केलेल्या सूचनेचे तातडीने पालन करीत 'धन्यवाद पुणेकर आणि पुणे पोलिस' असे म्हणत त्यांची विनम—ता दाखवली. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे या वेळी पालन करण्यात आले, हे तितके खरे असले तरी पोलिसांची कार्यक्रम बंद पाडण्याची पध्दत चुकीची असल्याची चर्चा समाजमाध्यमांवर आहे