

पुणेः वैभवशाली परंपरा असलेल्या गणशोत्सवासाठी पुणे पोलिस सज्ज झाले असून, उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी तब्बल सात हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात केला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत वाहतूक नियोजन, सर्व्हेलन्स कॅमेरे, मोबाइल सर्व्हेलन्स वाहने कार्यरत राहणार असून, मंडळाच्या स्वंयसेवकांची देखील मदत घेतली जाणार आहे. (Latest Pune News)
बॉम्ब शोधक आणि नाशक पथके, एसआरपीएफची तुकडी,त्याच बरोबर महिला सुरक्षा आणि चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी साध्या वेशात गुन्हे शाखेची पथके नेमण्यात आली आहेत. दहा दिवसाच्या कालावधीतील हे बंदोबस्ताचे नियोजन असणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त पंकज देशमुख, मनोज पाटील, राजेश बनसोडे, आदी उपस्थित होते. पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या 3 हजार 959 असून, तब्बल 7 लाख 45 हजार 944 खासगी गणेश मंडळे आहेत.
गणेशोत्सव दि.27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर कालावधीत पार पाडण्यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. स्थानिक पोलिस, वाहतूक शाखा, गुन्हे शाखेच्या पथकांना ठिकठिकाणी तैनात केले आहेत. दरम्यान, स्थानिक पोलिसांनी हद्दीतील गणेशोत्सवाच्या अनुषंगाने 82 आढावा बैठका, चौकी स्तरावर 32 बैठका, 60 शांतता कमिटी बैठका, 24 महिला दक्षात कमिटीच्या बैठका घेतल्या आहेत. त्यानुसार मंडळ पदाधिकार्यांशी सुसंवाद साधला आहे.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शांतता समिती, पोलिस मित्र समित्यांच्या बैठकीत चर्चा केली आहे.
अपर आयुक्त-4, पोलिस उपायुक्त -10, सहायक पोलिस आयुक्त -27, पोलिस निरीक्षक- 154, एपीआय/ उपनिरीक्षक-618, पोलिस अमंलदार-6 हजार 286, होमगार्ड-1100 एसआरपीएफ- एक तुकडी, त्याशिवाय बीडीडीएस पथके, क्यूआरटी टीम, वाहतूक शाखेचे पोलिस अधिकारी व अंमलदारांना नियुक्ती केली आहे. गुन्हे प्रतिबंधासाठी अॅन्टी चेन स्नॅचिंग पथक, मोबाइल चोरीविरोधी पथक, वाहन चोरी विरोधी पथक, महिला व बाल सुरक्षा पथक कार्यरत राहणार आहेत. गुन्हे शाखेचे 1 सहायक उपायुक्त, 6 पोलिस निरीक्षक, 32एपीआय, 253 पोलिस अमलदार नियुक्त केले आहेत.
यंदाचा गणशोत्सव राज्य उत्सव म्हणून साजरा केला जात असून, त्यादृष्टीने पुणे पोलिसांकडून निवडक चौकामध्ये विद्युत रोषणाई, पोलीस बँण्डचे वादन केले जाणार आहे. तसेच श्वान पथकाकडून डॉग शोचेही आयोजन केले जाणार आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, गेल्या वर्षी मेट्रोचा विस्तार शिवाजीनगर कोर्टापर्यंत होता. तेव्हा गणेशोत्सवाच्या काळात दररोज 1 लाख असणारी मेट्रोची प्रवासी संख्या वाढून 3 लाख झाली होती. आता कोर्टापासून स्वारगेटपर्यंत मेट्रोचा विस्तार झाला आहे. कसबा व मंडई ही दोन नवीन स्थानके मध्य वस्तीत आली आहेत. या स्थानकांवर गणेश भक्त मोठ्या संख्येने येण्याची शक्यता आहे. त्यामुळे गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी उपाय योजनांची आखणी करण्यात येत आहे. पुणे मेट्रो व्यवस्थापनाचे वरिष्ठ अधिकार्यांसोबत सविस्तर चर्चा करुन योग्य ती उपाय योजना आखण्यात आलीआहे. पहिल्या दोन -तीन दिवसात येथे येणारे व जाणारे यांच्या संख्येवरुन नेमका अंदाज येईल. त्यावरुन पुढील दिवसांमध्ये आणखी काय नियोजन करायचे हे निश्चित करण्यात येणार आहे.