पुणे: त्यांची दिवाळी साजरी झाली कामातच

पुणे: त्यांची दिवाळी साजरी झाली कामातच

पुणे, पुढारी वृत्तसेवा: 'यंदाची आमची दिवाळी कामातच साजरी झाली. तसेही दरवर्षी सण-उत्सवाला आम्ही घरी नसतो, तेव्हा आम्ही कर्तव्य बजावत असतो. कर्तव्य बजावणे, हेही देशाप्रती आपले योगदान देणे आहे. 24 तास ऑन ड्युटी असताना कुटुंबाला वेळ देता येत नाही, पण आम्ही कामातच खरा आनंद मानतो…' या भावना आहेत 24 तास ऑन ड्युटी असणार्‍या पोलिसांच्या, डॉक्टरांच्या आणि परिचारिकांच्या.

डॉक्टर, परिचारिका, पोलिस, औषध विक्रेते, स्वच्छता कर्मचारी आदींना दर वर्षी कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी करता येत नाही. कुटुंब आणि नोकरी याचा मेळ साधत त्यांना सण-उत्सव साजरे करावे लागतात. नोकरीतील सहकार्‍यांसोबत ते दिवाळी साजरी करतात आणि त्यातच आनंद शोधतात. दिवाळी म्हटलं, की सुट्टी अन् कुटुंबासोबत दिवाळीचा आनंद घेणे, असे समीकरण येते. पण, 24 तास ऑन ड्युटी असणार्‍यांची दिवाळी कुटुंबासोबत क्वचितच साजरी होते. कारण दिवाळीच्या दिवसांमध्येही ते आपले कर्तव्य बजावत असतात.

कुटुंबाबरोबर सण-उत्सव साजरी करण्याची उणीव त्यांना जाणवते. पण, त्यांच्यासाठी कर्तव्य बजावतानाचा आनंद महत्त्वाचा आहे. त्यामुळे आता कुटुंबही त्यांना पाठिंबा देऊ लागले आहे. यंदाही डॉक्टर, परिचारिका, पोलिस, औषध विक्रेते, स्वच्छता कर्मचार्‍यांनी लक्ष्मीपूजनाचा दिवस कामातच व्यतीत केला. सायंकाळी व्हिडिओ कॉलद्वारे कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांनी हा दिवस साजरा केला. तसेच, काम झाल्यानंतर रात्री उशिरा घरी गेल्यानंतर त्यांनी हा दिवस साजरा करण्याचा आनंद लुटला.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशीही कर्तव्य बजावले. सुट्टी मिळाली नाही. हा दिवस कामातच साजरा केला. यातच खरा आनंद आहे. मी पोलिस सहकार्‍यांबरोबर दिवाळी साजरी केली. दिवाळीला मी ऑन ड्युटी असते. पण, वेळ मिळाला तर मी कुटुंबासोबत नक्की दिवाळी साजरी करते. आम्ही दिवाळीच्या दिवशीही कामावर असतो. ही आमची जबाबदारी आहे. ती सांभाळत सण-उत्सव साजरे करण्याचा आम्ही प्रयत्न करतो.
– सुनंदा शहाणे ( वाहतूक पोलिस)

सण-उत्सवाला बर्‍याचदा आम्ही घरी नसतो, तर कर्तव्य बजावत असतो. कारण आम्हा डॉक्टरांसाठी रुग्णसेवा महत्त्वाची आहे. सण-उत्सवाला आम्ही घरी नसतो, याची उणीव जाणवते. पण, त्याला कुटुंबीयांचा पाठिंबा मिळतो. या वर्षीही कामातच लक्ष्मीपूजनाचा दिवस साजरा केला. रुग्णसेवा हेच माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. तीच खरी जबाबदारी आहे आणि त्यातच खरी दिवाळी आहे.
– प्रमोद लोहार (डॉक्टर)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news