Pune Police Flight Travel: आरोपींसाठी विमान प्रवास; फरासखाना पोलिसांच्या तत्परतेवर प्रश्नचिन्ह!

४० लाखांच्या चांदी चोरीसह अडीच कोटींच्या सोने अपहारातील आरोपींना कोलकात्यातून विमानाने पुण्यात आणले; प्रवासखर्च आणि प्रशासकीय मंजुरीबाबत सवाल
Police
PolicePudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: गुन्हे करून परराज्यात पसार झालेल्या आरोपींना पकडून आणण्यासाठी फरासखाना पोलिसांनी चक्क विमान प्रवासाचा पर्याय निवडल्याने पोलिस वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. ४० लाख ९० हजार रुपयांच्या चांदी चोरीप्रकरणातील लालन मंडल आणि अडीच कोटी रुपयांच्या सोने अपहार प्रकरणातील प्रबंजन शांती डोलाई या दोघांना कोलकाता येथून ताब्यात घेत पोलिसांनी थेट विमानाने पुण्यात आणले. आरोपींना पकडण्याची पोलिसांची तत्परता कौतुकास्पद असली, तरी या हवाई प्रवासाचा खर्च, वरिष्ठांची परवानगी आणि प्रशासकीय मंजुरी याबाबत आता प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

Police
Gokak Road Accident: यल्लम्मादेवीच्या दर्शनाला निघालेल्या पुण्यातील मांडरे कुटुंबावर काळाचा घाला; चिमुकल्यासह तिघांचा मृत्यू

गणेश पेठेतील सराफी दुकानातून १७ किलो चांदीचे दागिने आणि चांदीच्या विटा असा ४० लाख ९० हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता. दुकानातील कारागीर लालन मंडल यानेच ही चोरी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. दुकानमालकाने सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, लालन मोठी बॅग घेऊन पहाटेच्या सुमारास दुकानातून बाहेर पडताना दिसून आला होता. त्यानंतर त्याच्याविरुद्ध फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Police
Indigo Flight Emergency Landing: पुण्याहून गुवाहाटीला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे लँडिंग गिअर अडकले; १९२ प्रवाशांचे थरारक प्रसंगावधानाने प्राण वाचले

दुसऱ्या घटनेत रविवार पेठेतील सराफ व्यावसायिकाकडील १ हजार ८५० ग्रॅम शुद्ध सोने दागिने तयार करण्याच्या बहाण्याने घेतले होते. मात्र, दागिने तयार करून दिले तर नाहीच सोनेही परत न करता सुमारे दोन कोटी ५९ लाख रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात प्रबंजन शांती डोलाई आणि त्याच्या व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

Police
Amit Shah: राहुल गांधींवर अमित शहांचा हल्लाबोल; काँग्रेसला पुढील ३० वर्षे सत्तेपासून दूर राहावे लागेल

दोन्ही गुन्हे दाखल झाल्यानंतर आरोपींनी पुण्यातून पळ काढत कोलकाता गाठले. फरासखाना पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू होता. तपासादरम्यान दोन्ही आरोपी कोलकाता येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर एका पोलिस अधिकाऱ्यासह तीन कर्मचाऱ्यांचे पथक त्यांच्या शोधासाठी रवाना झाले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्यानंतर पुण्यात आणण्यासाठी विमान प्रवासाचा पर्याय निवडला. त्यानुसार आरोपींसह पोलिस पथकाने कोलकाता ते पुणे असा हवाई प्रवास केला.

सोन्याची किंमत जास्त म्हणून आरोपींना विमानाची सुविधा आणि सर्वसामान्यांच्या न्यायाला प्रतीक्षेचे तिकीट, असा फरासखाना पोलिसांचा कारभार आहे का? पोलिसांच्या तपासातील तत्परतेतही भेदभाव का? सोन्याच्या आरोपींसाठी दाखवलेली धडाडी इतर गुन्ह्यांतील आरोपींना पकडतानाही पोलिसांनी दाखवावी, अन्यथा ही तत्परता कर्तव्यनिष्ठेपेक्षा विशेष मर्जीचा विषय ठरणार नाही ना? असा सवाल उपस्थित होत आहे.

Police
Refrigerator Gas Leakage: रेफ्रिजरेटरमधील गॅस गळतीने स्फोट; दिवाळीत भाकरे कुटुंबाचा संसार आगीत खाक

आरोपींसाठी विमान; सामान्यांच्या गुन्ह्यांचे काय?

कोट्यवधींच्या सोन्याचा अपहार करणारे आरोपी पकडण्यासाठी फरासखाना पोलिसांनी थेट कोलकात्यापर्यंत धाव घेतली. रेल्वेऐवजी विमानाने आरोपींना पुण्यात आणण्याची तत्परता दाखवली. अनेकदा सामान्य नागरिकांच्या तक्रारींचा तपास कित्येक महिने रखडतो. आरोपी परराज्यात पसार झाले की तपासाची गती मंदावते. तक्रारदारांना पोलिस ठाण्याचे उंबरठे झिजवावे लागतात. मग कोट्यवधींच्या सोन्याच्या गुन्ह्यात मात्र एवढी तत्परता कशी काय?

खर्चाचा हिशेब कोण देणार?

ट्रेन चुकल्यामुळे ऐनवेळी विमानाने प्रवास केल्याचा दावा तपास पथकाकडून केला जात असल्याची माहिती आहे. मात्र, रेल्वेचा पर्याय उपलब्ध असताना विमान प्रवासाचा निर्णय कोणी घेतला? विमान प्रवासासाठी किती खर्च आला? हा खर्च सरकारी तिजोरीतून केला की अन्य कोणाच्या खिशातून केला? याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना पूर्वकल्पना आणि त्यांची परवानगी होती का? तसेच या खर्चाला अधिकृत मंजुरी घेतली होती का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. आरोपींना पकडण्याच्या तत्परतेसोबतच सरकारी पैशांच्या वापरात पारदर्शकता असणेही महत्त्वाचे आहे. त्यामुळे या प्रकरणात वरिष्ठ पोलिस अधिकारी काय भूमिका घेतात आणि प्रवासाच्या खर्चाची चौकशी होते का, याकडे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.