पुणे : मुंबईनंतर पुणे हे राज्यातील दुसरे महत्त्वाचे शहर आहे. पुण्यात देशभरातून नाही, तर जगभरातून नागरिक येत असतात. आयटी, उद्योग, शैक्षणिक संस्था, मानाच्या लष्करी संस्था पुण्यात आहेत. गेल्या दशकात शहराचा झपाट्याने विस्तार झाला. पण, या विस्तारित पुण्याच्या वाहतुकीचा भार सांभाळण्यासाठी शहरात पुरेशा रस्त्यांचा विकास झालेला नाही. शहर विकास आराखड्यातील अनेक रस्त्यांची कामे प्रलंबित आहेत. तर मिसिंग लिंकसह मुख्य रस्त्यांची कामे रखडली आहेत. शहराच्या एकूण क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून केवळ 7 ते 8 टक्केच रस्त्यांचा विकास झाल्याने पुणेकरांना रोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. (Pune Latest News)
पुण्याचा झपाट्याने विस्तार होत आहे. पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत नव्याने 23 गावांचा समावेश झाला आहे. त्यामुळे भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्रातील पुणे हे सर्वात मोठे शहर बनले आहे. शहराचे एकूण क्षेत्रफळ 519 चौरस किलोमीटर आहे. पुण्याने 440 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या मुंबईलादेखील मागे टाकले आहे. वाढत्या शहरीकरणामुळे पायाभूत सुविधांवर ताण आला आहे. त्यामुळे शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे.
शहर राज्यात वाहतूक कोंडीच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आले आहे. विकास आराखड्यानुसार, शहराच्या एकूण क्षेत्रफळाच्या 15 टक्के भागावर रस्ते असणे अपेक्षित आहेत. मात्र, पुण्याच्या क्षेत्रफळाच्या तुलनेत केवळ 7 ते 8 टक्के भागावर रस्त्याचे जाळे पसरलेले आहे. शहराची लोकसंख्या व क्षेत्रफळानुसार रस्त्यांचे जाळे कमी आहे. परिणामी वाहतूक कोंडी वाढली असून 10 किलोमीटर पार करण्यासाठी नागरिकांना अर्धा ते एक तासांचा वेळ द्यावा लागत आहे.
पुणे महानगरपालिकेनुसार, शहरात एकूण 2044 किलोमीटर रस्त्यांची लांबी आहे. यापैकी 1400 किलोमीटर रस्त्यांची लांबी महापालिकेच्या जुन्या हद्दीत आहे. समाविष्ट असलेल्या 34 गावांच्या रस्त्यांसह, महापालिकेची एकूण 2044 किलोमीटर रस्त्यांची लांबी आहे. नगररचना नियम आणि विकास आराखड्यानुसार, शहरातील एकूण क्षेत्रफळाच्या 15 टक्के भागावर रस्ते विकसित केले पाहिजेत. पुणे शहराचे एकूण क्षेत्रफळ आता 519 चौरस किलोमीटर आहे. मात्र, शहरात सर्व प्रकारच्या रस्त्यांसह केवळ 2044 कि.मी लांबीचे रस्ते विकसित झाले आहेत. पुणे शहराच्या क्षेत्रफळाचा विचार केला तर शहरात फक्त 8 टक्के रस्ते उपलब्ध आहेत. त्यामुळे शहरातील वाहतुकीवरील ताण वाढत आहे आणि नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
शहराच्या विकास आराखड्यानुसार, जुन्या हद्दीत एकूण 1384 कि.मी. लांबीचे रस्ते आहेत. त्यापैकी केवळ 425 कि.मी. लांबीच्या रस्त्यांचे रुंदीकरण पूर्ण झाले आहे. मात्र, अद्याप 500 किमी लांबीच्या रस्त्यांचे रुंदीकरण पूर्ण झाले नाही. भूसंपादनाला लागणार्या मोठ्या कालावधीमुळे देखील 459 रस्त्यांचे रुंदीकरण रखडले आहे.
0 ते 9 मीटर - 672.9 कि.मी.
9 ते 12 मीटर - 298 कि.मी.
12 ते 24 मीटर - 315.4 कि.मी.
24 ते 30 मीटर - 60.54 कि.मी.
30 ते 36 मीटर - 29.96 कि.मी.
36 ते 61 मीटर - 23.29 कि.मी.
शहराच्या क्षेत्रफळानुसार तब्बल 15 टक्के जागेवर रस्ते असणे अपेक्षित आहे. मात्र, केवळ 8 टक्के रस्त्यांचे जाळे शहरात विस्तारले आहे. पथ विभागामार्फत अपूर्ण रस्ते पूर्ण केले जात आहेत. तर जे रस्ते महत्त्वाचे आहेत ते पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारकडून निधीची मागणी केली आहे. हे रस्ते पूर्ण करण्यासाठी प्राधान्याने कामे सुरू आहेत.
- अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, रस्ते विभाग, पुणे महापालिका