

अशोक मोराळे
पुणे : मायानगरी मुंबईनंतर प्रामुख्याने पुणे शहर अमली पदार्थ तस्करांच्या रडारवर राहिले आहे. शहरातील अमली पदार्थ तस्करीची व्याप्ती खर्या अर्थाने पुढे आली ती ससून रुग्णालयातून ललित पाटीलकडून चालवण्यात आलेली ड्रग्जची मंडी आणि त्यानंतर कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील अर्थ केम लॅबरोटरीजमध्ये सुरू असलेला मेफेड्रोनचा कारखाना, कुरकुंभमध्ये तयार झालेले मेफेड्रोन थेट विमानाने लंडनपर्यंत पोहोचले अन् आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेटच्या पटलावर पुण्याचे नाव याच निमित्ताने समोर आले.
पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने मागील अडीच वर्षांत मोठ्या कारवाया करत तस्करांचे कंबरडे मोडल्याचेदेखील दिसून येते. सन 2023 ते जून 2025 या कालावधीत तब्बल 3 हजार 601 कोटी 83 लाख 27 हजार 789 रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने गांजा, कोकेन, मेफेड्रॉन, एलएसडी स्टॅम्प, अफिम, अफिमच्या बोंडाचा चुरा, ब—ाऊन शुगर, एलएसडी, एमडीएमए , मशरूम, हशिश ऑईल, कॅथा इटुलिस (खत), यांचा समावेश आहे. तर दुसरीकडे अमली पदार्थ तस्करीच्या बाबतीत 211 गुन्हे दाखल करण्यात आले असून, 338 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यामध्ये 16 महिलांचा समावेश आहे.
पोलिसांच्या पाहणीत 18 ते 28 वयोगटांतील तरुण अमली पदार्थाची नशा करत असल्याचे आढळून आले आहे. अमली पदार्थामध्ये सर्वाधिक नशा गांजाची केली जाते. 80 ते 90 च्या दशकांत अंमली पदार्थांमध्ये कोकेन, ब—ाऊन शुगरची चलती होती. मात्र, काळ बदलला, तसा हा व्यवसायदेखील तेवढ्याच गतीने बदलला. गुन्हेगारांनी थेट औद्योगिक वसाहतीत ड्रग तयार करण्याचे कारखाने थाटले.
आत्तापर्यंत शहरात अमली पदार्थांची तस्करीमध्ये नायजेरियन गुन्हेगार आघाडीवर होते. मात्र गेल्या काही दिवसांतील कारवाया पाहता, त्याचे धागेदोरे पुण्यापासून थेट दिल्ली ते लंडनपर्यंत असल्याचे समोर आले. नायजेरियन तस्कर पूर्वी गोवा, मुंबई येथून कोकेन, ब—ाऊन शुगरची तस्करी ते पुण्यात करत होते. त्यानंतर शहरातील कोरेगाव पार्क, मुंढवा, बाणेर, हिंजवडी येथील उच्चभ्रू परिसरातील पब, हॉटेलमध्ये त्यांची विक्री करतात, तर गांजाची राजस्थान, कर्नाटक, मध्य प्रदेश येथून पुणे, मुंबई शहरात पुरवला जातो. हिमाचल प्रदेशातून अफीम पुण्यात दाखल होते.
कॉलेज तरुण-तरुणींना एलएसडी (स्टॅम्प) या अमली पदार्थाची विक्री करणारी टोळी डार्कवेबद्वारे अमली पदार्थ खरेदी करत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने या टोळीचा पर्दाफाश करत तब्बल 1 कोटी 14 लाखांचे स्टॅम्प जप्त केले होते. त्यामुळे पुण्यात डार्कनेटवर्कद्वारे नशेचा बाजार भरत असल्याचे पुढे आले आहे. याप्रकरणी, उच्चशिक्षित पाच तरुणाना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या.
शहरातील अमली पदार्थ तस्करीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यामध्ये प्रत्येक पोलिस ठाण्याची थेट जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. पोलिस स्टेशनकडून कार्यक्षेत्रात मागील पाच वर्षांत झालेल्या अंमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांचा अभ्यास करून त्यावर आधारित पुनर्रचना करावी. त्यानुसार संशयास्पद व्यक्ती, ठिकाणे आणि विक्री केंद्रे यांच्यावर लक्ष केंद्रित करून कारवाई करण्यात यावी.
शाळा, महाविद्यालये आणि त्यांच्या परिसरातील पानशॉप्स, तसेच कॅफे अशा ठिकाणांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे, जेथे अल्पवयीन मुलांना अंमली पदार्थ सहज उपलब्ध होण्याची शक्यता अधिक असते. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी पोलिस विभागाला औद्योगिक विभाग आणि संबंधित कंपन्यांकडूनही सहकार्य घेण्याचे आदेशही दिले आहेत.
एकटेपणा, मानसिक अस्थिरता, दबाव आणि ओळख निर्माण करण्याच्या संघर्षामध्ये सध्याची तरुणाई अडकली आहे. डिजिटल युगात मुले स्मार्टफोनसह वाढतात; पण समजून घेणारा एकही माणूस जवळ नसतो. दिसायला चांगले असावे, व्यक्तिमत्त्व चांगले असावे, भरपूर यश मिळावे, अशा तणावाचा सामना करण्यासाठी तरुणाई व्यसनांचा आधार घेते. आजकाल शालेय मुलांमध्येही अमली पदार्थांचा वाढता वापर ही धोक्याची घंटा ठरत आहे.
प्रत्येक वर्षी 26 जून हा दिवस जागतिक अमली पदार्थविरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या समाजात निर्माण झालेली व्यसनांची लाट तरुणांचे आयुष्य गिळून टाकत आहे. स्वस्त व सहज उपलब्ध पदार्थ ही संकटाची दुसरी बाजू आहे. श्रीमंत मुले एलएसडी, कोकेन याकडे वळतात. तर, गरीब वर्गातील तरुण व्हाइटनर, खोकल्याचे सिरप आणि गोंद यांसारख्या घातक गोष्टीमध्ये अडकतात. हे सर्व कायदेशीर विक्रीतून मिळणारे पदार्थ असूनसुद्धा त्याचा गैरवापर होतो. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी मुलांना आणि पालकांचा संवाद वाढण्याची गरज असल्याचे मत जाणकारांनी नोंदविले आहे.
स्वारगेट परिसरातून अमली पदार्थांची तस्करी करणार्या एका तरुणाला पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून 6 किलो गांजा जप्त करण्यात आला. त्याच्याकडील चौकशीअंती पोलिसांच्या विशेष पथकाने वेळापूर, पंढरपूर येथून त्याच्या साथीदारांना पकडले. त्यांच्याकडून गांजाची वाहतूक करण्यासाठी वापरलेली इन्होव्हा क्रिस्टा गाडी, मोबाईल असा 16 लाख 46 हजारांचा माल जप्त केला आहे.
नितीन नरसिंह पाल (वय 23, रा. वेळापूर, जि. सोलापूर) असे स्वारगेट बसस्थानकाजवळ पकडलेल्या तस्कराचे नाव आहे. तर अल्ताफ ईलाई तांबोळी (वय 28) आणि विठ्ठल ऊर्फ दादा हरी शिवपाल (वय 31, दोघेही रा. वेळापूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर) अशी त्याच्या साथीदारांची नावे आहेत.
सहायक पोलिस आयुक्त राहुल आवारे यांच्या कार्यालयातील पोलीस अंमलदार राहुल होळकर, विक्रम सांवत यांना स्वारगेट बस स्टँड येथे एक दाढी राखलेली, मानेवर इंग्रजीमध्ये टॅट्यू काढलेला, डोक्यावर काळी टोपी, काळी पँट घातलेला तरुण वेळापूर येथे जाणारी बस पकडण्यासाठी थांबला आहे. त्याच्याकडे गांजासारखा अंमली पदार्थ आहे, अशी माहिती खबर्याकडून मिळाली. या खबरीनुसार पोलीस अंमलदार त्याला शोधण्यासाठी स्वारगेट बसस्टँडवर गेले.
पंढरपूर बसस्टॉपवर त्याला शोधून बॅगेबाबत विचारणा करताच तो बॅग सोडून पळून जाऊ लागला. तेव्हा पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्या बॅगेत गांजा मिळून आला. अधिक चौकशी केल्यावर त्याने अल्ताफ तांबोळी व विठ्ठल शिवपाल यांच्यामार्फत हा माल विक्रीसाठी पुण्यात घेऊन आल्याचे सांगितले. उर्वरित साठा इन्होव्हा क्रिस्टा गाडीत साठा करून ठेवला असल्याची माहिती दिली. सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांनी विशेष पथक तयार केले. पोलिस निरीक्षक संपतराव राऊत, पोलिस अंमलदार राहुल होळकर, विक्रम सावंत, फिरोज शेख, सुजय पवार यांनी वेळापूर या भागात आरोपींच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून त्याआधारे शोध घेऊन पकडले. या कारवाईत 1 लाख 21हजार रुपयांचा 6 किलो गांजा, 15 लाखांची इन्होव्हा क्रिस्टा गाडी, 25 हजारांचे 3 मोबाईल असा 16 लाख 46 हजार रुपयांचा माल जप्त केला.