

पुणे : पुढारी वृत्तसेवा : आकर्षक रांगोळी… विविध स्पोर्ट्स गेम… ठिकठिकाणी लावलेल्या कमानी, मर्दानी खेळ, ई-बाईक राईड, अशी पुणेकरांची धम्माल-मस्ती सोमवारी दिवसभर लक्ष्मी रस्त्यावर सुरू होती. निमित्त होते पादचारी दिनाचे. एरव्ही वाहनांनी गजबजलेला हा शहरातील प्रमुख रस्ता कधी नव्हे, पूर्ण रिकामा होता. त्यामुळे पुणेकर पादचार्यांना आनंद गगनात मावेना. बच्चे कंपनी, शालेय विद्यार्थी, तरुण-तरुणी व महिलांसह ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येत आनंद घेतला.
दरवर्षीप्रमाणे यंदाही पुणे महानगरपालिकेच्या वतीने पादचारी दिनाचे आयोजन केले होते. त्याचे उद्घाटन सोमवारी सकाळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुध्द पावसकर, अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे, माजी मुख्य अभियंता (पथ विभाग) व्ही. जी. कुलकर्णी, पर्यावरण विभागाचे प्रमुख माधव जगताप व अन्य व्यापारी संघटनेचे, पथारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
लक्ष्मी रस्त्याच्या शेजारी कपडे, फळे, खाद्यपदार्थ विक्रेते यांचे स्टॉल लागले होते. त्यासोबतच वाहतूक नियमांची माहिती देणारे स्टॉलदेखील होते. तसेच सापशिडीसारखे गेम, व्हॉलीबॉल, टेबल टेनिस, फुटबॉल, सायकलिंग, ई-बाईक राईड यांसारख्या खेळांच्या माध्यमातून वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्यात आली. चिमुकल्यांसाठी या ठिकाणी छोट्या सायकलींची व्यवस्था करण्यात आली होती. बच्चे कंपनी या सायकलवर राईड मारत धम्माल करताना पाहायला मिळाले.
नगरकर तालीम चौकापासून गरूड गणपती चौकापर्यंतचा रस्ता सोमवारी बंद करण्यात आला होता. राष्ट्रीय कला अकादमीच्या वतीने या मार्गावर ठिकठिकाणी आकर्षक रांगोळी काढण्यात आल्या होत्या. त्या रांगोळ्यांच्या माध्यमातून विविध आरोग्यदायी संदेश देण्यात आले होते. 'चालणे हीच आरोग्याची गुरुकिल्ली आहे' या प्रकारचे संदेश सोमवारी पादचार्यांना लक्ष्मी रस्त्यावर पाहायला रांगोळीतून मिळाले. मैदानी खेळांचे प्रात्यक्षिक या वेळी लक्ष्मी रस्त्यावर पाहायला
मिळाले.
महापालिका प्रशासनाच्या वतीने लक्ष्मी रस्त्यावर दिशादर्शक रंगांची देखील सुंदर आखणी करण्यात आली होती. त्यामुळे
लक्ष्मी रस्ता खूपच उठून दिसत होता. मोकळ्या रस्त्यावर चालताना सुमधुर संगीताची जोड असल्यामुळे पादचार्यांना सोमवारी एक वेगळाच आनंद मिळाला. लक्ष्मी रस्त्यावर तरुण हौशी छायाचित्र कारांनी आणि रील स्टार्सने सुध्दा गर्दी केली होती.
गेल्यावर्षीप्रमाणे पादचारी दिन शनिवारी येथे साजरा झाला. मात्र, तरीही शनिवार असल्याने आमचा व्यवसाय त्यावेळी चांगला झाला होता. यंदा मात्र, सोमवार आणि पादचारी दिनामुळे आमच्या व्यवसायाला प्रतिसाद कमी मिळाला.
– अथर्व सिध्दे, कपडे व्यावसायिक, लक्ष्मी रस्ता
आमच्या काळी असा उपक्रम कधीही राबविण्यात आला नाही. त्यावेळी गाड्यासुध्दा नगण्य होत्या. आम्ही सायकलवर फिरायचो. आता हा उपक्रम आम्हाला पहायला मिळतोय, खूप छान वाटले. संपूर्ण लक्ष्मी रस्ता कधी नव्हे तो मोकळा दिसला.
– लक्ष्मीकांत शहा, ज्येष्ठ नागरिक
हेही वाचा