Pune News : नांदेड परिसरात पाणीटंचाईच्या झळा

Pune News : नांदेड परिसरात पाणीटंचाईच्या झळा

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : सिंहगड रस्त्यावरील नांदेड, सिंहगड रस्ता परिसरातील हजारो नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसल्याने नांदेड व परिसराला बंदिस्त जलवाहिनीतून नवीन कनेक्शन देण्याचा निर्णय अनेक दिवसांपासून लालफितीत अडकला आहे. त्यामुळे नांदेडकरांवर पाणीटंचाईचे संकट कायम आहे.

अपुरा पाणीपुरवठा असल्याचे प्रशासन मान्य करीत आहे. मात्र, त्यावर मात करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात नाहीत, अशी तक्रार खडकवासला भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा रश्मी घुले व महिलांनी केली आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणार्‍या खडकवासला धरणावरील बंदिस्त जलवाहिनीतून नवीन कनेक्शन देण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
याबाबत पाणीपुरवठा विभागाला निवेदनही दिले. मुख्य सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटा, गोसावी वस्ती, गावठाण आदी ठिकाणी अनियमित व अपुर्‍या पाण्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. खासगी टँकरला मागणीही वाढली आहे.

जलवाहिनीतून कमी प्रमाणात पाणी मिळत आहे. त्यामुळे काही काळ पंप बंद करावे लागत होता. मात्र, आता पाण्याचे प्रमाण वाढल्याने पाणीपुरवठ्यात सुधारणा झाली आहे. बंदिस्त जलवाहिनीतून नवीन कनेक्शन देण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. नवीन कनेक्शन मिळाल्यानंतर पाणीपुरवठ्याची समस्या दूर होण्यास मदत होईल.

-अक्षय गावित, शाखा अभियंता, नांदेड पाणीपुरवठा विभाग

ग्रामपंचायत काळातील योजनेवर नांदेडगाव व परिसराची तहान भागवली जात आहे. महापालिकेत समावेश झाल्यापासून पाणीपुरवठा कोलमडला आहे. महापालिका कोट्यवधी रुपयांचा कर गोळा करीत आहे. मात्र, पाणीटंचाईची समस्या दूर करण्याकडे दुर्लक्ष केले आहे.

-रश्मी घुले, अध्यक्षा, खडकवासला भाजप महिला आघाडी

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news