Pune News : दोन लाख भाविकांनी घेतले श्री खंडेरायाचे दर्शन

Pune News : दोन लाख भाविकांनी घेतले श्री खंडेरायाचे दर्शन

जेजुरी : सोमवती यात्रेनिमित्त अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत आणि बहुजन समाजाचा लोकदेव म्हणून प्रचलित असलेल्या खंडेरायाच्या दर्शनासाठी आणि कर्‍हा स्नान, कुलधर्म-कुलाचारासाठी ऐतिहासिक जेजुरीनगरीत दोन लाखांहून अधिक भाविकांची गर्दी झाली होती. या वेळी खंडेरायाच्या पालखी सोहळ्यावेळी मंदिर गडकोटांसह कर्‍हा नदीतीरी भंडाराची उधळण करीत, सदानंदाचा येळकोट…येळकोट -येळकोट जयमल्हार… असा जयघोष केला.

सोमवती यात्रेच्या निमित्ताने रविवारपासूनच शहरात कोकणी बांधवांसह राज्यातील विविध ठिकाणांवरून आलेल्या भाविकांनी कुलधर्म-कुलाचार व देवदर्शनासाठी गर्दी केली होती.सोमवारी सकाळी सात वाजता देवाचे मानकरी पेशवे इनामदार तसेच खोमणे, माळवदकर यांनी इशारा करताच पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला.या वेळी देवसंस्थानच्या वतीने बंदुकीच्या फेरी झाडून सोहळ्याला सलामी देण्यात आली. पालखीसमोर निशाण,छत्रचामरे ड्ढअब्दागिरी तसेच घडशी समाजबांधवांच्या वतीने सोहळ्यापुढे सनईचे मंगलमय सूर निनादत होते.

मंदिर प्रदक्षिणेनंतर भंडारगृहातील श्री खंडोबा व म्हाळसादेवीची उत्सव मूर्ती पालखीत ठेवण्यात आली व पालखी सोहळा गडावरून निघताच हजारो भाविकांनी येळकोट येळकोट जयमल्हारचा जयघोष करीत खंडोबा देवाचे लेण असणारा पिवळ्या जर्द भंडाराची उधळण केली.संपूर्ण गड परिसर भंडाराने न्हाऊन निघाला. या वेळी देवसंस्थान विश्वस्तांसह – समस्त पुजारी, सेवेकरी,खांदेकरी,मानकरी सहभागी झाले होते.

राज्यातून आलेल्या भाविकांच्या भंडारा उधळणीत पालखी सोहळा पायरीमार्गावरून बानुबाई मंदिरमार्गे, नदीचौक मार्गाने पुढे जाऊन ऐतिहासिक छत्रीमंदिर (मल्हार-गौतमेश्वर) येथे स्थिरावला. त्यानंतर गावातून सोहळा मिरवत कर्‍हा नदीकडे मार्गस्थ झाला.वजनाने प्रचंड जड असलेली पालखी खांद्यावर घेऊन सुमारे पाच किलोमीटरचे अंतर पूर्ण केले. दुपारी साडेबाराच्या सुमारास पालखी सोहळा कर्‍हा नदीवरील रंभाईशिंपीन कट्ट्यावर (पापनाशतीर्थ) स्थिरावला. कर्‍हा नदीवर मानकरी व भाविकांनी उत्सवमूर्तींना विधिवत क-हास्नान घालण्यात आले.

या वेळी समस्त पुजारी, सेवेकरी, मानकरी. खांदेकरी यांचेसह भाविकांनी कर्‍हा स्नानाची पर्वणी लुटली. देव अंघोळीनंतर समाज आरती झाली. पालखीसोहळा परतीच्या मार्गावर धालेवाडीकरांनी व दवणेमळामार्गे पालखी सोहळा जानाई मंदिरात पोहचला . जेजुरीचे ग्रामदैवत जानाई मंदिराचा विसावा झाल्यानंतर पालखीसोहळा रात्री दिवटी बुधालीच्या मंद प्रकाशात मानवी साखळी करीत गडावर दाखल झाला. रोजमुरावाटप होऊन सोहळ्याची सांगता झाली.

जेजुरी पोलिसांनी या यात्रेत चांगले नियोजन केले. पालखी सोहळ्यात चेंगराचेंगरी सारखे प्रकार होऊ नयेत यासाठी श्रीमार्तंड देवसंस्थानच्या वतीने पालखी सोहळ्यातील खांदेकरी व मानकरी यांना ड्रेस कोड दिल्याने सोहळा शिस्तबद्धपणे पार पडला.

होही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news