Pune News : अग्निशमन केंद्राचे काम रखडलेलेच !

Pune News : अग्निशमन केंद्राचे काम रखडलेलेच !

पौड रोड : पुढारी वृत्तसेवा : कोथरूड भाग झपाट्याने विकसित होत आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबर नागरिकांच्या मूलभूत सुविधांमध्ये वाढ करणे गरजेचे आहे. याची दखल घेत चांदणी चौक येथे अग्निशमन केंद्र व पुण्यात पहिले ट्रेनिंग सेंटर उभारण्याचे काम सुरू करण्यात आले खरे; पण ते संथगतीने सुरू आहे. या भागात एरंडवणे, कोथरूड अशी दोन अग्निशमन केंद्रे आहेत. झपाट्याने वाढ होत असलेले गृहप्रकल्प आणि वाढती लोकसंख्या बघता हे अग्निशमन केंद्र व ट्रेनिंग सेंटर सुरू करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला. त्यासाठी चार कोटी रुपये मंजूरही करण्यात आले. पुणे शहरातील सर्वांत मोठे अग्निशमन केंद्र व प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येत आहे.

केंद्र उभारल्याने पौड रोड, कोथरूड, बावधन, वारजे, शिवणे, मुळशी, खडकवासला ग्रामीण भागातील परिसरात तातडीने मदत पोचविणे शक्य होणार आहे. जून 2019 मध्ये या केंद्राचे भूमिपूजन झाले. त्यानंतर काम झपाट्याने सुरू झाले. पुढील वर्षभरात हे केंद्र पूर्ण होईल, अशी अपेक्षा होती. पण, आता चार वर्षे झाली तरी अद्याप काम पूर्ण झाले नाही. फक्त या ठिकाणी केंद्राचा सांगाडा उभा आहे.

त्यात कुठलेही नियोजन झालेले नाही. हे काम आतापर्यंत पूर्ण होऊन त्या ठिकाणी केंद्र सुरू व्हायला हवे होते, असे नागरिकांचे म्हणणे आहे. पण, अद्याप तसे झालेले नाही; तरी याची प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
माजी नगरसेविका अल्पना वरपे म्हणाल्या की, अग्निशमन केंद्राचे काम लवकरात लवकर पूर्ण करून घेण्यासाठी संबंधित विभागाशी पाठपुरावा सुरू आहे.

केंद्राची वैशिष्ट्ये

  • 2 लाख 65 हजार लिटरची पाण्याची टाकी
  • 5 गाड्यांची व्यवस्था
  • प्रशिक्षितांसाठी अत्याधुनिक हॉल
  • जिम, स्टोअर रूम तसेच कर्मचार्‍यांसाठी निवासस्थान

हे काम बंद असल्याने या इमारतीच्या परिसरात मद्यपींचा वावर वाढला आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा आहे.

– राजाभाऊ जोरी,
स्थानिक नागरिक

निधी आल्याने आता अग्निशमन केंद्राचे काम सुरू होत आहे. आता तीन कोटींचे टेंडर मंजूर झाले आहे. हे काम लवकरात लवकर करीत आहोत.

– वीरेंद्र केळकर,
कार्यकारी अभियंता, भवन व रचना विभाग

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news