पुणे : गेल्या दहा वर्षांत जानेवारी व फेब्रुवारी महिन्यातील कमाल व किमान तापमानात मोठी दरी तयार झाल्याने वातावरणात मोठे बदल झाले आहेत. तापमान किमान 7 ते 8, तर कमाल 31 अंशांवर गेल्याने दिवसभरातील फरक तब्बल 22 ते 23 अंशांचा आहे. त्यामुळे शरीरावर त्याचे विपरीत परिणाम झाले असून, आजारांचे प्रमाण तिपटीने वाढले आहे. त्वचारोगासह श्वसनाच्या विकारांत मोठी वाढ
झाल्याचे डॉक्टरांचे मत आहे.
गेल्या 24 तासांत शहराच्या किमान तापमानात 3 ते 4 अंशांनी वाढ झाली आहे. शनिवारी शहराचे तापमान 11 ते 12 अंशांवर होते. एनडीएचा पारा 11.5, तर शिवाजीनगरचा पारा 12.6 अंशांवर होता. मात्र, रविवारी एनडीएचे तामपान 13.2, तर शिवाजीनगरचे किमान तापमान 14.1 अंशांवर गेले होते. शहराचे कमाल तापमान 33 अंशांवर गेले होते.
शहरातील कमाल व किमान तापमानात मोठी दरी निर्माण झाल्याने तज्ज्ञांनी धोक्याचा इशारा दिला आहे. त्वचारोग, श्वसनाचे विविध विकार, कोविड, स्वाइन फ्लूची लागण होऊ शकते. प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांसह जे लोक सिगारेट ओढतात तसेच ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे, ज्यांची फुप्फुसे कमजोर आहेत, त्यांना हे आजार जडत आहेत. स्वाइन फ्लू आणि कोविडचा मुक्काम शहरात वाढण्याचे हेदेखील एक कारण आहे.
पुणे शहरातील थंडी पूर्वीसारखी राहिली नाही. गुलाबी थंडी सुमारे दहा वर्षांपासून गायब झाली, याचे कारण ग्लोबल वॉर्मिंगसह शहरातील वाढते प्रदूषण हेही आहे. सिमेंटचे रस्ते, धूलिकणांचे वाढते प्रमाण, यामुळे हिवाळ्यात थंडी पडत असली तरी कमाल तापमान खूप जास्त वाढत असल्याने पहाटे, रात्री अन् दिवसभराच्या तापमानात गेल्या दहा वर्षांत मोठी दरी निर्माण झाल्याने शहरातील वातावरण विचित्र झाले आहे. तापमानाचा सतत शरीरावर विपरीत परिणाम होऊन त्वचारोग, सतत सर्दी, खोकला, व्हायरल इन्फेक्शन, दमा यांसारख्या आजारांत वाढ होत आहे. प्रामुख्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांवर या वातावरणाचा लवकर परिणाम दिसत आहे. बदलत्या हवामानाला सामोरे जाताना काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
तापमानातील प्रचंड तफावतीमुळे आमच्याकडे रुग्णांची गर्दी वाढली आहे. प्रामुख्याने श्वसनाचे विकार वाढले आहेत. ज्यांची फुप्फुसे कमजोर आहेत, त्यांना न्यूमोनिया, स्वाइन फ्लू, कोविड अजूनही होत आहे. त्यासाठी नियमित व्यायाम, संतुलित आहार, गर्दीच्या ठिकाणी मास्क घालणे, हाच उपाय आहे.
– डॉ. अमित द्रविड, विषाणुजन्य विकारतज्ज्ञ, पुणे
हेही वाचा