खडकवासला : सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी फाट्याजवळ एका हॉटेलसमोर असलेल्या आंब्याच्या झाडावरून उच्च दाबाच्या वीज वाहिनीवर पडल्याने शॉक बसून एका मादी माकडाचा मृत्यू झाला. मृत आईच्या कुशीत शिरून या मादीचे पिल्लू आक्रोश करीत होते. या प्रसंगाने प्रत्यक्षदर्शींचे हृदय हेलावून गेले. शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. विजेच्या धक्क्याने रस्त्यावर पडलेल्या मादीचा जागीच मृत्यू झाला. मादीसोबत असलेले तिचे पिल्लू मृत मादीच्या कुशीत बसून आक्रोश करू लागले.
पिलाचा आवाज ऐकून नागरिकांनी धाव घेतली. आईच्या कुशीत बसून आक्रोश करणारे पिलू पाहून दृश्य पाहणार्या नागरिकांचे डोळे पाणावले. आंब्याच्या झाडाची वाळलेली फांदी मोडल्याने विजेच्या तारांवरून मादी खाली पडली. त्यामुळे मादीचा जागीच मृत्यू झाला, असे वनविभागाचे म्हणणे आहे. गेल्या महिन्यात खानापूर जवळील एका फार्म हाऊसमध्ये फळे खाण्यासाठी शिरलेल्या दोन माकडांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता. सिंहगड-खडकवासला परिसरात घनदाट जंगल वनराई आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. या परिसरातील वाढती बांधकामे वन्यप्राण्यांच्या जीवावर बेतू लागली असल्याचे चित्र पुढे आले आहे. याकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
मृत माकडाच्या मादीवर जंगलात अंत्यसंस्कार करण्यात आले. तिचे पिल्लू रेस्कू पथक येण्याच्या आधीच शेजारच्या जल संशोधन केंद्राच्या झुडपात माकडांच्या कळपात निघून गेले.
– दयानंद ऐतवाड, वनरक्षक, खडकवासला वन विभाग
हेही वाचा