पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील पाचवी आणि आठवीसाठी वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा आणि मूल्यमापन कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार पाचवीला प्रत्येक विषयासाठी पन्नास गुण, आठवीला प्रत्येक विषयाची साठ गुणांची परीक्षा शाळास्तरावर होणार आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना जूनमध्ये पुनर्परीक्षेची संधी दिली जाणार असून, पुनर्परीक्षेतही अनुत्तीर्ण झाल्यास विद्यार्थ्याला त्याच वर्गात ठेवले जाणार आहे. यंदापासूनच या कार्यपद्धतीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. शालेय शिक्षण विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जाहीर केला आहे.
शिक्षण हक्क कायद्यातील कलम 16 नुसार कोणत्याही बालकास त्याचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत एकाच वर्गात ठेवता येणार नाही अथवा बालकास शाळेतून काढून टाकता येणार नाही. मात्र, केंद्र सरकारने कलम 16 मध्ये सुधारणा करून पाचवी, आठवीसाठी वार्षिक परीक्षा अनिवार्य केली आहे. त्यानुसार राज्यातही पाचवी, आठवीसाठी परीक्षा लागू करण्यात आली आहे. विद्यार्थी वार्षिक परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करून परीक्षेच्या निकालानंतर दोन महिन्यांत पुनर्परीक्षा घेतली जाणार आहे.
पुनर्परीक्षेतही अनुत्तीर्ण झाल्यास संबंधित विद्यार्थ्याला पाचवी किंवा आठवीच्याच वर्गात ठेवले जाईल. मात्र, प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याला शाळेतून काढले जाणार नाही. पाचवीसाठी प्रथम भाषा, द्वितीय भाषा, तृतीय भाषा, गणित, परिसर अभ्यास भाग 1 आणि भाग 2, तर आठवीसाठी प्रथम भाषा, द्वितीय भाषा, तृतीय भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्रे हे वार्षिक परीक्षेसाठी असणार आहेत. पाचवीच्या प्रत्येक विषयाच्या परीक्षेसाठी तोंडी किंवा प्रात्यक्षिक परीक्षेसाठी दहा गुण, लेखी परीक्षेसाठी 40 गुण असे एकूण 50 गुण, तर आठवी तोंडी किंवा प्रात्यक्षिक परीक्षेसाठी दहा गुण, लेखी परीक्षेसाठी 50 गुण, असे एकूण 60 गुण असा गुणभार निश्चित करण्यात आला आहे.
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार द्वितीय सत्रातील संकलित मूल्यमापन दोन हे वार्षिक परीक्षा म्हणून संबोधण्यात येईल. मात्र, संकलित मूल्यमापन एकचे मूल्यमापन प्रचलित सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार होईल. वार्षिक परीक्षा ही शैक्षणिक वर्षाच्या द्वितीय सत्रातील अभ्यासक्रम, पाठ्यक्रम, अपेक्षित अध्ययन निष्पत्तीवर आधारित असेल. कला, कार्यानुभव, आरोग्य आणि शारीरिक शिक्षण या विषयांसाठी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार केवळ आकरिक मूल्यमापन करायचे आहे.
या विषयांसाठी वार्षिक परीक्षा आणि पुनर्परीक्षा असणार नाही. एप्रिलच्या दुसर्या आठवड्यात शाळास्तरावर वार्षिक परीक्षा आयोजित करावी लागेल. सत्राअखेरीस अन्य इयत्तांसोबतच पाचवी आणि आठवीचा निकाल जाहीर करावा लागणार आहे. विद्यार्थी वार्षिक परीक्षेला अनुपस्थित राहिल्यास तो अनुत्तीर्ण समजला जाईल. मात्र, पुनर्परीक्षेची संधी दिली जाईल. विदर्भात जूनच्या दुसर्या आठवड्यात, तर उर्वरित राज्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात पुनर्परीक्षा घेतली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा