Pune News : संत तुकोबाराय यांच्याबद्दलचे ते वक्तव्य गैरसमजातून

Pune News : संत तुकोबाराय यांच्याबद्दलचे ते वक्तव्य गैरसमजातून
Published on
Updated on

देहूगाव : पुढारी वृत्तसेवा : श्री संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल आपण केलेले वक्तव्य हे एक लेख वाचून केले होते. त्या वक्तव्याबाबतचा अर्थ आपणांस समजला नाही, त्यामुळे ती आपली चूक झाली असून, याबाबत मी हे समाज माध्यमांपुढे कबूल केले आहे. संतांच्या आशीर्वादामुळे संपूर्ण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू स्वराज्य स्थापनेचा संकल्प केला होता.

तो संपूर्ण देशात राबवून हा देश एक हिंदूराष्ट्र बनावे, अशी मनोकामना आपण संत तुकोबांचरणी व्यक्त केल्याचे बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री महाराज म्हणाले. संत तुकाराम महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे अडचणीत आलेल्या बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री अखेर बुधवार (दि. 22) देहूमध्ये येत संत तुकाराम महाराजांच्या चरणी लीन झाले. संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. या वेळी देहू देवस्थान संस्थानचे विश्वस्त संजय महाराज मोरे, जयश मोरे आणि इतर आजी माजी अध्यक्ष विश्वस्त उपस्थित होते.

धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, 'संत तुकोबांच्या अभंग गाथा ज्या इंद्रायणी नदीत बुडविल्या होत्या, तेव्हा संत तुकोबांनी आपल्या तपाच्या सामर्थ्यावर त्यांना हात न लावता, स्पर्श न करता त्या ओल्या न होता इंद्रायणी नदीतून वर आणल्या. ही आमच्या देशातील संतांची परंपरा आहे.' देहू देवस्थान संस्थानविषयी बोलताना धीरेंद्र शास्त्री महाराज म्हणाले की, देहू देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त हे या ठिकाणी येणार्‍या व पालखी सोहळ्यात वारकरी भाविकभक्त व वारकरी संप्रदायाची सेवा चांगल्या प्रकारे करीत आहेत.  त्यांनी या ठिकाणी वारकरी संप्रदाय, संतपरंपरांचे दर्शन घडविले; विठ्ठल-रखुमाई, संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचे मला दर्शन घडविले. त्यामुळे खूप समाधान वाटले.

कडक पोलिस बंदोबस्त

धीरेंद्र शास्त्री महाराज हे बुधवारी साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास श्रीक्षेत्र देहूगाव येथे मुख्य मंदिरात दर्शनासाठी आले. देहूरोड पोलिस स्टेशनच्या वतीने सकाळपासूनच कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

वंशजांकडून निषेध

धीरेंद्र शास्त्री महाराज यांचा आदर सत्कार करण्यात आला. त्यांनी त्यांचे कर्तव्य पार पाडले, त्या विषयी दुमत नाही; मात्र तुकोबारायांना मान्य नसलेली अंधश्रद्धा पसरविणार्‍या आणि त्याच तुकोबारायांचा अपमान करणार्‍या धीरेंद्र शास्त्री यांचा आम्ही निषेध करत असल्याचे संत तुकाराम महाराजांचे वंशज हभप संभाजी महाराज मोरे म्हणाले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news