नारायणगाव उपसरपंचपदी बाबू पाटेंची बिनविरोध निवड | पुढारी

नारायणगाव उपसरपंचपदी बाबू पाटेंची बिनविरोध निवड

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : नारायणगाव ग्रामपंचायत उपसरपंच पदाची आज निवड पार पडली. सर्व सदस्यांनी एकमताने माजी लोकनियुक्त सरपंच व विद्यमान सदस्य बाबू पाटे यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड केली. उपसरपंच पदासाठी एकमेव अर्ज बाबू पाटे यांचा आल्याने त्यांची उपसरपंच म्हणून घोषणा करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद माजी सदस्या आशा बुचके, भाजपा तालुका अध्यक्ष संतोष खैरे, जुन्नर पंचायत समितीचे माजी सदस्य दिलीप गांजाळे, आशिष माळवतकर राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुका अध्यक्ष ( शरद पवार गट ) सुरज वाजगे,अँड. राजू कोल्हे, शरद दरेकर तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

आम्ही सगळे सदस्य नवीन असल्याने उपसरपंच पदाची जबाबदारी बाबू पाटे यांच्यावर द्यावी असे सर्व सदस्यांनी एकमुखी सांगितल्याने उपसरपंच पदासाठी बाबू पाटे यांचा एकमेव अर्ज आला. उपसरपंच म्हणून बाबू पाटे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यावेळी आशा बुचके व संतोष नाना खैरे यांच्या हस्ते सरपंच सौ. शुभदा वावळ उपसरपंच बाबू पाटे तसेच सर्व सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
नारायणगावकरांनी आमच्यावर टाकलेला विश्वास आम्ही सार्थक ठरवू आणि निवडणुकीच्या काळामध्ये मतदारांना दिलेले शब्द या पाच वर्षांमध्ये पूर्ण करू अशा प्रकारची ग्वाही उपसरपंच बाबू पाटे यांनी यावेळी बोलताना दिली.

मागच्या पाच वर्षांमध्ये काही कार्यकर्ते दुरावले होते परंतु यावेळी तशी परिस्थिती राहणार नाहीत सर्वांना बरोबर घेऊन नारायणगाव शहर पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक सुंदर आणि चांगले विकास झालेले शहर करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न राहील. असे त्यांनी सांगितले.
नारायणगावच्या जनतेने सर्वाधिक मतांनी मला लोकनियुक्त सरपंच केले त्यांचा विश्वास मी सार्थ करून सर्व सदस्य उपसरपंच बाबू पाटील यांना विश्वासात घेऊन नारायणगाव शहराचा विकास करील असे सरपंच शुभदा वाव्हाळ यांनी यावेळी बोलताना सांगितले.

जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य आशा बुचके यांच्या माध्यमातून नारायणगाव मध्ये करोडो रुपयांचा निधी गेल्या पाच वर्षांमध्ये विकास कामांना मिळाला आणि त्यामुळेच नारायणगावकरांनी नारायणगाव ग्रामपंचायतची सत्ता पुन्हा आपल्या ताब्यात दिली या विजयाचे खरे श्रेय आशाताई बुचके यांना जाते. असे यावेळी बोलताना भाजपचे तालुका अध्यक्ष संतोष खैरे यांनी सांगितले. नारायणगाव शहराचा आपण विकास मोठ्या प्रमाणात केलाय उर्वरित काम सुद्धा तात्काळ आपण मार्गी लावू.

आज सरपंच उपसरपंच व सदस्य यांचा पदग्रहण समारंभ होण्यापूर्वी एक कोटींपेक्षा जास्त कामांचे भूमिपूजन करण्यात आलेले आहे असे सांगत आशाताई बुचके म्हणाल्या की भविष्यकाळामध्ये नारायणगाव शहराचा विकासाच्या माध्यमातून सगळ्यांना सोबत घेऊन चेहरा मोहरा बदलायचा आहे. मला खात्री आहे सरपंच शुभदा वाव्हळ आणि उपसरपंच बाबू पाटे नारायणगाव शहराच्या विकासासाठी त्यांची मला साथ मिळणार आहॆ. माझे कडून नारायणगाव शहराच्या विकासाला नेहमीप्रमाणेच विकासाचा निधी सर्वाधिक दिला जाईल अशी ग्वाही जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य आशा बुचके यांनी दिली.

हेही वाचा

अचानक लागलेल्या आगीत बस खाक ; सर्व प्रवासी सुखरूप

वेदना संपत नाही..! केएल राहुलचे भावनिक ट्विट

Pune : कोंढापुरी येथे चार वाहनांची धडक

Back to top button