

पुणे : नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने सिंहगड दंत महाविद्यालय आणि रुग्णालयाची संलग्नता रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून लागू होणार आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना सिंहगड दंत महाविद्यालयात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
विद्यापीठ अधिनियम मधील तरतुदींचा भंग केल्याचा ठपका महाविद्यालयावर ठेवण्यात आला आहे. तसेच विद्यापीठाने ठरवून दिलेल्या शैक्षणिक दर्जानुसार महाविद्यालयाचे कामकाज नसल्याचे निदर्शनास आल्याने दंतविद्याशाखेतील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम असंलग्नित करण्यात आला आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विद्यापरिषदेची २३ जानेवारीला बैठक झाली. या बैठकीमध्ये संलग्नता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, महाविद्यालयात सध्या शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी त्यांना राज्यातील दुसऱ्या खासगी महाविद्यालयांमध्ये कायमस्वरूपी प्रवेश बदली करून देण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांना दुसऱ्या महाविद्यालयात प्रवेश देण्याबाबतची प्रक्रिया विद्यापीठामार्फत करण्यात येणार आहे. महाविद्यालयाने सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना थकीत वेतनाची संपूर्ण रक्कम अदा करावी. त्याबाबतचा अहवाल विद्यापीठाला सादर करावा. त्यानंतर महाविद्यालयाला संलग्नतेच्या नुतनीकरणासाठी पुन्हा प्रस्ताव सादर करता येणार आहे. या प्रस्तावानंतर आवश्यक तपासणी करून पुढील निर्णय घेतला जाईल, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.
महाविद्यालयातील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना ऑगस्ट २०१८ ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीतील वेतन अधिकृतपणे देण्यात आले होते. मात्र, नंतर महाविद्यालयाने हे वेतन धनादेशाद्वारे परत घेतले.ही रक्कम लवकरच परत केली जाईल, असे आश्वासन दिले. परंतु अद्याप कर्मचाऱ्यांना ही रक्कम मिळालेली नाही.डिसेंबर २०१९ ते मे २०२२ या कालावधीत केवळ मूळ वेतन अदा करण्यात आले आहे. तसेच मे २०२४ पासून आतापर्यंत एकही वेतन प्राप्त झालेले नाही. अशा तक्रारी कर्मचाऱ्यांनी केल्या होत्या. त्यांनतर विद्यापीठाने त्यांच्यावर संबंधित कारवाई केली आहे.