Pune News : माती विभागातून सिकंदर उपांत्य फेरीत

Pune News : माती विभागातून सिकंदर उपांत्य फेरीत
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सिंकदर शेखने महाराष्ट्र केसरी गटातून आपली आगेकूच कायम राखताना सोलापूरच्या विशाल बनकरचे तगडे आव्हान 9-8 असे एका गुणाने मोडून काढत माती विभागातून उपांत्य फेरीत प्रवेश केला. 66 व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पहिल्या फेरीत विशालचा ताबा मिळवत भारंदाज डावावर प्रत्येकी दोन गुण मिळवत सिकंदरने 4 गुणांची कमाई केली. विशालनेही दोन गुणांनी चुरस कायम राखली. अखेरच्या तीन मिनिटांच्या फेरीत सिंकदरचा चपळपणा निर्णायक ठरला.

गादी विभागात लढतीत शिवराजने आक्रमक पवित्रा घेत जयसिंगला तांत्रिक आघाडीवर 10-0 असे पराभूत केले. पहिल्या 10 सेकंदांतच दोन गुणांची कमाई केली. जयसिंगला प्रतिकाराची संधीच दिली नाही. सिकंदरने देखील आपला वेगवान आणि चपळ कुस्ती खेळण्याचा लौकिक कायम राखताना धुळ्याच्या रितीक रजपूतचे आव्हान अगदी सहज परतवून लावले. बगलडुप डावाने सुरुवात करताना सिकंदरने नंतर भारंदाज आणि दुहेरी, तसेच एकेरी पटाचेही डाव खेळत झटपट गुणांची वसुली केली.

या गटातील अन्य लढतींत सातार्‍याच्या तुषार ठोबरेने मुंबईच्या बालाजी मेटकर, तर मुंबई शहरच्या विक्रम भोसलेने ठाण्याच्या प्रशांत शिंदेचा पराभव करून माती विभागातून आगेकूच कायम राखली. दरम्यान, गादी विभागातील 57 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीच्या लढतीत बीडच्या आतिश तोडकरने आपला लौकिक कायम राखताना आणखी एक लढत एकतर्फी जिंकताना आपले वर्चस्व राखले.

आतिशने 57 किलो वजनी गटात गादी विभागातून अंतिम फेरी गाठताना ओंकार शिर्केचा तांत्रिक 10-0 अशा आघाडीवर पराभव केला. विजेतेपदासाठी त्याची गाठ आता सोलापूरच्या आकाश सरगरशी पडणार आहे. आकाशने पहिल्या फेरीतच पिंपरी-चिंचवडच्या प्रणव सस्तेवर 6-0 अशी आघाडी घेतली. दुसर्‍या फेरीसाठी प्रणव मॅटवर आलाच नाही. त्यामुळे आकाशला विजयी घोषित करण्यात आले.

विविध वजनी गटात दमदार कामगिरी

स्पर्धेतील 74 किलो वजनी गटातील उपांत्य फेरीत पुण्याच्या अनिल कचरेने जालन्याच्या पवन बावणेचा 13-3, तर गडचिरोलीच्या संदेश शिपमुळेने कोल्हापूरच्या आकाश कपडेचा 7-1 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. माती विभागातील 57 किलो वजनी गटात कृष्णा हरणावळने अंतिम फेरी गाठताना सातार्‍याच्या विशाल रुपनरचा 18-8 आणि सोलापूरच्या सौरभ इगवेने पुणे शहरच्या अभिजित शेडगेचा 10-0 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. अंकुश माने (79 किलो), लखन म्हात्रे (79 किलो), सुदर्शन पाटील (92 किलो), राम धायगुडे (86 किलो), सचिन दाताळ (65 किलो) यांनी आपल्या मोहिमेस विजयी सुरुवात केली.

 हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news