Pune News : स्वराविष्काराने सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची दमदार सुरुवात

Pune News : स्वराविष्काराने सवाई गंधर्व भीमसेन  महोत्सवाची दमदार सुरुवात
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : स्वरांचा साज अन् वादनाच्या उत्स्फूर्त लयीने रंगलेल्या वातावरणात 69 व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या स्वरयज्ञाला बुधवारी दमदार सुरुवात झाली. तुकाराम दैठणकर यांच्या सनई वादनाने झालेली सुरेल सुरुवात अन् त्यानंतर दिग्गज कलाकारांच्या गायकीने स्वरांचा साज चढवला, या स्वरांच्या प्रवासात रसिक मंत्रमुग्ध झाले. जन्मशताब्दीनिमित्त पं. कुमार गंधर्व यांना त्यांच्या कन्या कलापिनी कोमकली यांनी केलेले स्वराभिवादन, तेजेंद्र नारायण मजुमदार यांच्या सरोदवादनाने लावलेले चार चाँद अन् पं. उल्हास कशाळकर यांची दमदार गायकी….अशा सुरांच्या प्रवासाने पहिला दिवस रसिकांसाठी खास ठरला. रसिकांच्या गर्दीने खर्‍या अर्थाने स्वरोत्सवाची सुरुवात झाल्याची प्रचिती दिली.

आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित महोत्सवाच्या पहिल्या दिवशी वैविध्यपूर्ण कलाविष्काराने पूर्वार्ध जितका दमदार ठरला, तितकाच उत्तरार्धही शानदार ठरला. परंपरेनुसार तुकाराम दैठणकर यांच्या सनई वादनाने महोत्सवाची सुरेल सुरुवात झाली. त्यांनी राग मधुवंतीने सुरुवात केली. पुत्र नितीन दैठणकर यांनी केलेली सनईची साथ लक्षवेधी ठरली. त्यांना कार्तिक स्वामी, गणेश दैठणकर, केतकी दैठणकर, मयूरी दैठणकर यांनी साथसंगत केली. 'वैष्णव जन तो' या भजनाच्या वादनाने त्यांनी सांगता केली. यानंतर किराणा घराण्याचे गायक संजय गरूड यांचे सुमधुर गायन झाले.

त्यांनी आपल्या गायनाची सुरुवात राग भीमपलासमधील 'अब तो बडी देर' या रचनेतून केली. रागवाचक आलापीतून भीमपलासचा स्वरविस्तार त्यांनी उत्तम मांडला. त्याला जोडून द्रुत त्रितालात 'बीरज मे धूम मचाए शाम' ही प्रसिद्ध बंदिश त्यांनी रंगवली. 'माझे माहेर पंढरी' या प्रसिद्ध अभंगाने त्यांनी भक्तिरसपूर्ण भाव निर्माण केले. त्यांना शांतीभूषण देशपांडे, रोहन पंढरपूरकर, प्रसाद कुलकर्णी, ऋत्विज हिर्लेकर, माऊली फाटक, फारुख लतिफ खान, तर गायनसाथ दिनेश माझिरे यांनी केली. 97 वर्षीय माऊली टाकळकर यांनी त्यांना दिलेल्या साथीने मैफलीला वेगळीच उंची प्राप्त झाली.

कलापिनी कोमकली यांनी आपल्या बहारदार सादरीकरणातून कुमारजींच्या समृद्ध आणि प्रयोगशील गायन वारशाचे दर्शन घडवले. समयानुकूल अशा राग पूरिया धनाश्रीमध्ये कलापिनी कोमकली यांनी विलंबित एकतालात ख्यालाची मांडणी साधली. दोन्ही रचना पं. कुमार गंधर्व यांच्या होत्या. 'आ जरा दिन डूबा' या बंदिशीतून सायंकालीन वातावरण मूर्तिमंत उभे राहिले. 'मृगनयनी तेरो यार री' ही रचना अतिशय ढंगदारपणे त्यांनी पेश केली. त्यानंतर राग हमीरमध्ये त्रितालात त्यांनी आक्रमक तानांचे पॅटर्न घेत हा उत्तरांप्रधान राग मोजक्या वेळात 'कैसे घर जाऊ लंगरवा' या रचनेतून खुलवला.

रसिकांच्या आग्रहास्तव त्यांनी पं. कुमार गंधर्व यांनी अजरामर केलेली 'सुनता है गुरु ग्यानी' ही निर्गुणी रचना प्रस्तुत करत रसिकांना कुमारजींची आठवण करून दिली. त्यांना प्रशांत पांडव, सुयोग कुंडलकर यांनी साथसंगत केली. तानपुरा साथ वत्सल कपाळे आणि वैदेही अवधानी यांनी केली. पं. तेजेंद्र नारायण मुजुमदार यांनी आपल्या धीरगंभीर सरोदवादनाने 'सवाई' च्या स्वरमंचावर पहिल्या दिवशीच्या उत्तरार्धात राग जयजयवंतीच्या माध्यमातून जणू स्वरसाम्राज्य निर्माण केले.

आलाप, जोड, झाला या पारंपरिक क्रमाने त्यांनी राग जयजयवंतीची खुलावट केली. विलंबित त्रितालातील त्यांचे वादन जणू 'जयजयवंती' च्या कॅनव्हासवर रागवाचक स्वराकृती चितारत होते. त्यानंतर झपताल आणि द्रुत त्रितालातील वादनात त्यांनी लयकारीचे उत्तम दर्शन घडवले. सरोद आणि तबल्याची सवाल जवाबांची जुगलबंदीही रंगली. 'सवाई' च्या पहिल्या दिवसाची सांगता ज्येष्ठ गायक पं. उल्हास कशाळकर यांच्या स्वरसमृद्ध गायनाने झाली. राग दरबारीचे गंभीर सूर स्वरमंडपात निनादताच, रसिकांनी भरभरून दाद दिली.

विलंबित तिलवाडा तालात निबद्ध 'दुलहन आज बनी' या रचनेच्या माध्यमातून पं. कशाळकर यांनी दरबारीचे राजस रूप उलगडत नेले. द्रुत बंदिशीत त्यांनी तबल्याच्या साथीने लयकारीचे वैविध्यपूर्ण आविष्कार दर्शवले. त्यांना तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांनी तबल्याची, तर सुधीर नायक यांनी संवादिनीची रंगत वाढविणारी साथसंगत केली. तराणा सादर करून 'तुम हो जगत के दाता' या भैरवीने त्यांनी गायनाची सांगता केली.

परंपरेप्रमाणे जंगली महाराज रस्त्यावर असलेल्या छत्रपती श्रीसंभाजी महाराज उद्यानातील सवाई गंधर्व यांच्या पुतळ्याला सवाई गंधर्व आणि पंडित भीमसेन जोशी यांचे कुटुंबीय यांनी एकत्र येऊन पुष्पहार अर्पण केला. आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी, शिल्पा जोशी, विराज जोशी, शुभदा मुळगुंद, पं. उपेंद्र भट, आनंद भाटे, डॉ. प्रभाकर देशपांडे, मिलिंद देशपांडे, पद्मा देशपांडे, शैला देशपांडे, श्रुती देशपांडे आदी उपस्थित होते.

त्या मैफलीच्या स्मृती कोरलेल्या

सवाई महोत्सवात 12 डिसेंबर 1991 रोजी पं. कुमार गंधर्व यांचे गायन झाले होते. त्यानंतर महिनाभरातच त्यांचे निधन झाले होते. 'सूनता है गुरू ग्यानी' या भजन गायनानंतर कलापिनी कोमकली यांनी 'अजूनही 12 डिसेंबर 1991 या दिवसाच्या मैफलीची स्मृती मनावर कोरलेली आहे', अशी भावना कलापिनी कोमकली यांनी व्यक्त केली. माझे बाबा हे भजन गात होते. त्यांना पं. लालजी गोखले तबल्यावर आणि डॉ. अरविंद थत्ते संवादिनीची साथ करत होते, असेही त्यांनी सांगितले.

आजपासून संगीताची दिवाळी असलेला हा महोत्सव सुरू होत आहे ही खूप आनंदाची गोष्ट आहे. या स्वरोत्सवात मला पहिल्या दिवशी कला सेवा करण्याची मिळालेली संधी याचाही आनंद आहे.
– पं. उल्हास कशाळकर,
ज्येष्ठ गायक

महोत्सवातील आजचे सादरीकरण
(गुरुवारी, 14 डिसेंबर)

  • अंकिता जोशी (गायन)
  • पं. उपेंद्र भट (गायन)
  • पार्था बोस (सतारवादन)
  • डॉ. अश्विनी भिडे देशपांडे (गायन)

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news