

पुणे : पीएमपीत वरिष्ठ अधिकार्यांच्या (आयएएस, अध्यक्ष) कालावधी संपण्याआधीच होणार्या बदल्यांमुळे पीएमपीच्या लाईव्ह लोकेशन अॅपला मोठा फटका बसला आहे. 2019-20 पासून हे लाईव्ह लोकेशन सुरू करण्यासंदर्भात चर्चा सुरू झाली होती. तब्बल पाच वर्षे लोटली तरी हे लाईव्ह लोकेशन अद्यापपर्यंत पीएमपीत सुरू झालेले नाही. यासाठी आणखी
3 महिने लागणार आहेत.
शहरात ओला, उबरसारख्या अॅपच्या माध्यमातून धावणार्या चारचाकी आणि तीनचाकीसह रॅपिडो दुचाकीवर प्रवासी वाहतूक करणार्या दुचाकीस्वारांचे देखील लाईव्ह लोकेशन समजते. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचतो आणि महिलांना देखील दिवसा-रात्री सुरक्षित प्रवास करणे सोपे होते. पीएमपीत देखील अशी सेवा असावी, अशी पीएमपीच्या अनेक अध्यक्षांची आणि पुणेकर प्रवाशांची इच्छा आहे. मात्र, अनेक वर्षांपासून पीएमपीत लाईव्ह लोकेशनची (ट्रॅकिंग) सेवा सुरू करण्याची फक्त चर्चाच आहे.
पीएमपीमध्ये अॅपद्वारे लाईव्ह लोकेशनची सेवा 15 जानेवारी 2024 पर्यंत म्हणजेच आगामी तीन महिन्यांच्या कालावधीत सुरू करण्यात येणार आहे. ही सेवा सुरू झाल्यावर पुणेकर प्रवाशांना ओला, उबरप्रमाणेच पीएमपी बसचे लाईव्ह ट्रॅकिंग करता येणार आहे. दिनांक 6 ऑक्टोबर 2023 पासून ईबीक्स या ठेकेदारामार्फत ही सेवा राबविण्याला सुरुवात झाली आहे. मोबाईल अॅपद्वारे लाईव्ह लोकेशन सेवा, ऑनलाईन पेमेंट, ऑनलाईन पास पेमेंट, व जर्नी प्लॅनिंग करण्याच्या सुविधा पुरवल्या जाणार आहेत.
तत्कालीन पीएमपी अध्यक्ष नयना गुंडे, सह व्यवस्थापकीय संचालक अजय चारठणकर यांच्या काळात या लाईव्ह लोकेशन सेवा सुरू करण्याची चर्चा झाली. त्यानंतर डॉ. राजेंद्र जगताप, लक्ष्मीनारायण मिश्रा, ओमप्रकाश बकोरिया, सचिंद्र प्रताप सिंह यांच्या काळात या सेवेमध्ये अनेक सुधारणा झाली. लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या शेवटच्या कार्यकाळात ही सेवा प्रत्यक्षात आणण्यासाठी जोरात कार्यवाही सुरू झाली. त्या वेळी सह व्यवस्थापकीय संचालक डॉ.चेतना केरूरे होत्या.
त्यानंतर सचिंद्र प्रताप सिंह यांनी या सेवेचा आग्रह धरत याचे काम अंतिम टप्प्याकडे आणले आहे. आता नवीन अध्यक्ष डॉ. संजय कोलते आणि सह व्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर यांच्या हातात हे काम आले आहे. पीएमपीतील या अनेक अध्यक्ष आणि सहव्यवस्थापकीय संचालकांना काम करण्यासाठी वेळ मिळाला नाही आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे अनेक चांगली कामे वेळेत पूर्ण होऊ शकलेली नाहीत. आतातरी लाईव्ह लोकेशनचे काम डॉ. कोलते आणि नार्वेकर यांच्या काळात पूर्ण होऊ शकणार का, असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे.
मोबाईल अॅपचे काम सुरू असून ते अंतिम टप्प्यात आहे. क्युआर कोड (युपीआय) तिकीट सेवा नुकतीच सुरू केली आहे. अॅपमध्ये पेमेंट गेटवेसाठी अप्रुव्हल येणे बाकी आहे. ते आल्यावर आम्ही प्रायोगिक तत्त्वावर लाईव्ह लोकेशन सेवा सुरू करणार असून, त्यानंतर येत्या 15 जानेवारीपर्यंत ही सेवा पूर्णपणे सुरू करण्याचा आमचा मानस आहे.
– नितीन नार्वेकर, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल
हेही वाचा