गुजरातमधून महाराष्ट्रात म्हशींची अवैध वाहतूक; पिंपळनेर पोलिसांची कारवाई | पुढारी

गुजरातमधून महाराष्ट्रात म्हशींची अवैध वाहतूक; पिंपळनेर पोलिसांची कारवाई

पिंपळनेर; पुढारी वृत्तसेवा : ट्रकमधून म्हशींची होणारी वाहतूक गोरक्षकांच्या सतर्कतेने उघड झाली. या कारवाईत सहा लाखांच्या ट्रकसह 3 लाख 94 हजार रूपये किंमतीच्या म्हशी मिळून एकूण 9 लाख 94 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल पिंपळनेर पोलिसांनी जप्त केला.

प्रणिल फाउंडेशन, तहाराबाद महाराष्ट्रचे कार्यकर्ते वैभव बच्छाव यांनी आद्यगोरक्षक श्री शिवछत्रपती गोरक्षक जनआंदोलन, महाराष्ट्र धुळे-पिंपळनेरचे गोरक्षक शुभम सूर्यवंशी यांना (दि.19) गुजरात राज्यातील आनंद येथुन मालेगावकडे ट्रकमधून (क्र. जी. जे. 02/झेड. झेड.7872) म्हशींची वाहतूक केली जात असल्याची माहिती दिली. त्यानुसार शुभम सूर्यवंशी, यांनी रूपेश मंडलिक, ललित वाघ यांना सोबत घेवून सटाणा रोडवर आज पहाटे चार वाजताच्या सुमारास पाळत ठेवली.

पहाटे साडेचार ते पाच वाजताच्या दरम्यान वरील संशयित ट्रक सटाणा रोडवरील आनंद पेट्रोल पंपासमोर गोरक्षकांनी थांबविला. ट्रकमध्ये काय आहे, अशी विचारणा केली असता त्याने ट्रकमध्ये कंपनीचा माल असून मालेगावला म्हशी नेत असल्याचे सांगितले. मात्र कुठलाही ठोस कागदी पुरावा त्याचेकडे आढळून आला नाही. परिणामी, गोरक्षकांनी पिंपळनेर पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. माहिती मिळताच घटनास्थळावर पीएसआय अमित माळी, एएसआय अशोक पवार, पीसी सोमनाथ पाटील, पंकज वाघ, चंद्रकांत खैरनार दाखल झाले. त्यांनी ट्रक चालकास ताब्यात घेत ट्रकमधील गुजराती प्रजातीच्या म्हशींची मुक्तता करीत गोशाळेकडे रवाना केल्या.

या कारवाईत सहा लाखांच्या ट्रकसह 3 लाख 94 हजार रूपये किंमतीच्या गुजराती प्रजातीच्या म्हशी असा एकूण 9 लाख 94 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात चालक सुफियाखान ईस्माईल पठाण (26 रा. पथानवास, जि.पाटण, राजस्थान) याचे विरूध्द प्राणी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास असई अशोक पवार करीत आहेत.

Back to top button